नाशिक : करोनाच्या टाळेबंदीत दूध विक्रीत कमालीची घट झाली आहे. खासगी आणि सहकारी संघाकडून जाहीर केलेल्या दरात सरकार दूध खरेदी करत नाही. यामुळे उत्पादन खर्च देखील मिळत नसल्याने शासनाने गायीच्या दुधाला १० रूपये प्रतिलिटर, तर दूध भुकटीला ५० रुपये प्रति किलोस अनुदान द्यावे, अशी मागणी शिवसंग्राम आणि भाजपच्यावतीने करण्यात आली. यावेळी दूध पिशव्याही भेट स्वरुपात देण्यात आल्या. या मुद्यावरून राज्यभरात आंदोलन होत असून त्याची दखल न घेतल्यास एक ऑगष्ट रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दुधाच्या मुद्याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या भाजप, शिवसंग्राम, रिपाइं (आठवले गट) आणि रासपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. बँकेकडून नाकारला जाणारा कर्ज पुरवठा, बनावट बियाणामुळे सोयाबीनची करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तूटवडा आणि काळा बाजार, निसर्ग वादळामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान यात शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यातच दुधाचे भाव कमी झाल्याने उत्पादकांची अवस्था बिकट झाली आहे. राज्यात १५० लाख लिटर गायीचे दूध उत्पादित होते. त्यापैकी ३० लाख लिटर सहकारी संघ खरेदी करते. ९० लाख लिटर दूध खासगी संस्था आणि डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते.

करोनाच्या टाळेबंदीत दूध विक्रीत ३० टक्क्य़ांपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. सद्यस्थितीत खासगी संस्था, सहकारी दूध संघाकडून २० ते २२ रूपये दराने दूध खरेदी केले जात आहे. यामुळे दुधाचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. शासनाने १० लाख लिटर दूध २५ रुपये प्रति लिटर भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात सात लाख लिटर दूध खरेदी केले जात आहे. मंत्र्यांचे लागेबांधे असलेल्या दूध संघाकडून शासन दूध विकत घेत आहे. इतर शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप भाजपच्या आमदार  प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी केला आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारच्या काळात राज्यात कोणीही सुरक्षित नसल्याचा आरोप केला. १५ हजार ग्रामपंचायतीत सरकार आपल्या पक्षाच्या लोकांना बसविण्याच्या प्रयत्नात आहे.

सुरक्षित अंतराचे पथ्य धाब्यावर

निवेदन देण्यासाठी जमलेल्या महायुतीच्या शिष्टमंडळाला सुरक्षित अंतराच्या नियमाचा विसर पडला. शिवसंग्रामचे विनायक मेटे, भाजपच्या प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्षा खा. भारती पवार, आ. सीमा हिरे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, आ. राहुल ढिकले, रासपचे राजेंद्र कथोरे असे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने कामानिमित्त येणाऱ्यांना मर्यादित संख्येने प्रवेश देण्याचे धोरण ठेवले आहे. सुरक्षित अंतराचे पथ्य न बाळगता  त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन दिले.

.. तर दूध संकलन बंद

दुधाला प्रति लिटर १० रूपये अनुदान उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करावे, शासनाने ३० रूपये प्रति लिटरने दुधाची खरेदी करावी, दूध भुकटीसाठी प्रति किलोला ५० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली.  या संदर्भात लवकर निर्णय न झाल्यास भाजप, शिवसंग्राम, रासप, रिपाइं, रयत क्रांती यांच्यावतीने एक ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला.