त्र्यंबक नगराध्यक्षपदी भाजपच्या विजया लठ्ठा

समसमान संख्याबळाच्या आधारावर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर भगवा फडकविण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना भाजपने सुरुंग लावला. सेनेच्या एका नगरसेवकास गळाला लावून भाजपने निवडणुकीत बाजी मारली. नगराध्यक्षपदी भाजपच्या विजया लठ्ठा यांची, तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे बंडखोर संतोष कदम हे विजयी झाले.

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी झाली. ही नगरपालिका ताब्यात घेण्याच्या दृष्टिकोनातून सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पक्षांच्या नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश घडवून आणला होता. त्यात राष्ट्रवादीच्या चार, काँग्रेसच्या दोन, तर भाजपचा एक अशा सात नगरसेवकांचा समावेश होता. हे नगरसेवक शिवसेनेत आल्यामुळे पक्षाच्या पालिकेतील संख्याबळ आठवर गेले. दुसरीकडे भाजपचे संख्याबळही आठच आहे. समान संख्याबळामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले. शिवसेना व भाजपने नगराध्यक्षपद प्रतिष्ठेचे केले. पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित निवडणूक लढविण्यासाठी चर्चा केली. काही प्रस्तावही दिले गेले. या घडामोडी घडत असताना सेनेचे नगरसेवक संतोष कदम हे भाजपच्या गोटात सहभागी झाल्यामुळे या पक्षाच्या समीकरणांना धक्का बसला. कडेकोट पोलीस बंदोबस्तात ते सभागृहात दाखल झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पालिका परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

भाजपने शिवसेनेचे मनसुबे उधळून लावले. निवडणूक प्रक्रियेत भाजपतर्फे विजया लठ्ठा, तर शिवसेनेतर्फे सिंधुताई मधे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेत अलीकडेच प्रवेश घेणाऱ्या अंजना कडलग यांनी माघार घेतली. कदम हे शिवसेनेच्या बाजूने मतदान करतील अशी अपेक्षा शिवसेनेला होती, मात्र ती निराधार ठरली. निवडणुकीत भाजपच्या लठ्ठा यांना नऊ, तर शिवसेनेच्या मधे यांना सात मते मिळाली. कदम यांनी भाजपला मतदान केल्यामुळे शिवसेनेला पराभवाचे धनी व्हावे लागले. उपनगराध्यक्षपदासाठी शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता, त्यामुळे कदम यांची अविरोध निवड झाली.

निकाल जाहीर झाल्यावर भाजपच्या सदस्यांनी एकच जल्लोश करत विजयी मिरवणूक काढली. दरम्यान, १६ सदस्य संख्या असलेल्या या नगरपालिकेत निवडणुकीपूर्वी उलथापालथ होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीच्या निवडणुकीवेळी भाजपने मनसेच्या नगरसेवकांना फोडून भाजपमध्ये आणले होते.

सत्ता कोणत्या पक्षाकडे राहील, हे जोखून या ठिकाणी नगरसेवक पक्ष बदल करत असल्याचे अधोरेखित होते. महत्त्वाची पदे पदरात पडतील या आशेने विविध पक्षांच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला.