प्रशासनाची कार्यक्रम स्थळाची सूचना धुडकावली

नाशिक : महापालिका मुख्यालयातील प्रवेशद्वारासमोरील स्वागत कक्षाजवळ जयंती, पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याऐवजी ते याच इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील रेकॉर्ड सभागृहात करावे, ही प्रशासनाची सूचना बुधवारी सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनी धुडकावली. यामुळे सत्ताधाऱ्यांनी या माध्यमातून पुन्हा आयुक्तांना शह देण्याचा प्रयत्न केला.

करवाढ, विकास कामांसाठी लावलेली त्रिसूत्री, गणेशोत्सव मंडळांची बैठक, दाट लोकवस्तीच्या क्षेत्राबाहेरील सहा, साडेसात मीटरचे रस्ते नऊ मीटर करण्यासाठी काढलेले आदेश या घटनाक्रमाने आयुक्त तुकाराम मुंढे आणि भाजपचे पदाधिकारी यांच्यात संघर्ष सुरू आहे. गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीच्या आयोजनात त्याचे प्रतिबिंब उमटले होते. दरवर्षी ही बैठक महापौरांच्या पुढाकारातून आयोजित केली जाते. यंदा पालिका आयुक्तांनी ती बोलाविल्याने सत्ताधारी अस्वस्थ झाले. त्यांनी विरोधकांच्या मदतीने बैठकीवर बहिष्कार टाकला. शिवाय, गणेश मंडळांचे पदाधिकारी बहिष्कार टाकतील, अशी व्यवस्था केली. पालिकेत जमलेल्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. प्रशासन-सत्ताधारी संघर्षांचा नवीन अध्याय बुधवारी रंगला.

जयंती, पुण्यतिथीनिमित्त जे कार्यक्रम होतात ते मुख्य प्रवेशद्वारासमोरील स्वागत कक्षाजवळ आयोजित केले जातात. हे कार्यक्रम प्रवेशद्वारासमोर करण्याऐवजी ते पालिकेच्या राजीव गांधी भवन इमारतीत तिसऱ्या मजल्यावर रेकॉर्ड सभागृहात करावे, जेणेकरून सभागृहाचा वापर होईल, अशी सूचना आयुक्तांनी केल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी लोकमान्य टिळक यांच्या जयंतीचा कार्यक्रम त्याच सभागृहात महापौर, इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला होता.

दरम्यान, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पालिकेने साडेदहा वाजता बी. डी. भालेकर मैदानालगतच्या अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महापौर रंजना भानसी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. अभिवादनाचा तसाच कार्यक्रम मुख्यालयातील स्वागत कक्षाजवळ आयोजित करण्यात आला.

महापौरांसह भाजपचे प्रदेश पदाधिकारी वसंत गीते, उपमहापौर प्रथमेश गीते, सभागृह नेते दिनकर पाटील आदी उपस्थित होते.