भाजपच्या चित्रा वाघ यांचा आरोप

नाशिक : शहरातील सराफ व्यावसायिक विजय बिरारी यांनी आत्महत्या केली नसून तेलंगणा पोलिसांनी त्यांची हत्या केली आहे. हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. याची सखोल चौकशी करून तेलंगणा पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.

येथील सराफ संघटनेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत वाघ यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. बिरारी यांच्यावर चोरीचे सोने खरेदी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वास्तविक त्यांच्या दुकानातील सोने खरेदी-विक्रीच्या पावत्या आणि सोने याचा मेळ बसत असताना त्यांना तेलंगणा पोलिसांनी ताब्यात का घेतले, हा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला.

बिरारी यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली असता बिरारी हे आत्महत्या करू शकत नाहीत. त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्याने ते सरळ चालू शकत नव्हते. मागील वर्षी त्यांची हृदयशस्त्रक्रिया झाली होती. ज्या वेळी बिरारी यांचा मृतदेह पाहिला तेव्हा त्याची अवस्था दयनीय होती. शरीरावर ठिकठिकाणी ओरखडल्याचे आणि हात-पायांवर सळ्यांचे निशाण होते. यामुळे आत्महत्या नसून ती हत्याच आहे, असा आरोप बिरारी कुटुंबीयांनी केला.

बिरारी यांना सोमवारी तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या कुटुंबीयांनी याविषयी पंचवटी पोलीस ठाण्यात विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच मंगळवारी बिरारी यांना ताब्यात घेतल्याची नोंद आहे. घटना घडल्यानंतर संशयित तेलंगणा पोलीस यांनाच फिर्यादी करण्यात आले. हा सर्व प्रकार संशयास्पद असून याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी वाघ यांनी केली.

दरम्यान, राज्यात याआधी तेलंगणा पोलिसांच्या दबावतंत्रामुळे पाच सराफ व्यावसायिकांनी जीव गमावला असल्याचेही वाघ यांनी नमूद केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली असून अधिवेशनात याविरोधात आवाज उठविण्यात येईल. या संदर्भात सोमवारी पुणे येथे गुन्हे अन्वेषण विभागप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांची भेट घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.

तीन वर्षांत समन्वय समितीची बैठक नाही

बिरारी यांच्या मृत्यूप्रकरणी भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची शुक्रवारी भेट घेतली. सराफ व्यावसायिकांमधील काही गैरप्रकार पाहता सराफ व्यावसायिक आणि पोलीस यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. परंतु या समितीची तीन वर्षांत बैठकच झालेली नसल्याचे बिरारी यांच्या मृत्यूनंतर उघड झाले. पुढील आठवडय़ात समन्वय समितीची बैठक होणार असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. बिरारी यांच्या मृत्यू प्रकरणात पंचवटी पोलीसही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांची खातेअंतर्गत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी आपणास दिल्याचे वाघ म्हणाल्या.