निवडणूक आयोगानेच चौकशी करण्याची मनसेची मागणी

महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांकडून दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची ध्वनिचित्रफीत सर्वत्र दिसू लागल्यानंतर त्याविषयी सारवासारव करताना पक्षाच्या नाकीनऊ आले. त्यातच पक्षाला दहा लाख रुपये देऊनही उमेदवारी मिळाली नसल्याची तक्रार करणारी दुसरी ध्वनिचित्रफीत दिसू लागल्याने भाजपचे स्थानिक पदाधिकारी चांगलेच अडचणीत आले आहेत. ध्वनिचित्रफीत अर्धवट असून त्यात छेडछाड करून पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप भाजपचे स्थानिक नेते गोपाळ पाटील यांनी केला. उमेदवारीसाठी दहा लाख रुपये दिल्याचे फेटाळून लावतानाच यामागे मनसेचे संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर असल्याचा संशयही पाटील यांनी व्यक्त केला. तर, अभ्यंकर यांनी निवडणूक आयोगानेच यासंदर्भात चौकशी करावी, असे उत्तर दिले आहे.

भाजप आणि शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुकांची संख्या सर्वाधिक होती. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्याकडून पदाधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचे आरोप दोन्ही पक्षांमध्ये होत आहेत. त्यातच उमेदवारीसाठी दोन लाख रुपयांची मागणी पदाधिकाऱ्याकडून भाजप कार्यालयातच करण्यात आल्याची ध्वनिचित्रफीत शनिवारी माध्यमांमध्ये दिसू लागली. भाजपमधील अंतर्गत धुसफुसही त्यामुळे चव्हाटय़ावर आली. आमदार सीमा हिरे यांनी उमेदवारी देण्यात आपणांस विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप करीत यासंदर्भात आपण मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा दिला. पक्षाशी संबंधित कामांसाठी धनादेशाद्वारे निधीची मागणी करण्यात आल्याने त्यात वावगे काहीच नसल्याचा दावा करीत पदाधिकाऱ्यांकडून सारवासारव करण्यात आली.

या प्रकरणातून सावरण्याचा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न होत असतानाच रविवारी उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा आरोप करणारी दुसरी ध्वनिचित्रफीत माध्यमांमध्ये दिसू लागली. या ध्वनिचित्रफितीत पक्षाचे स्थानिक नेते गोपाळ पाटील हे दहा लाख रुपये देऊनही उमेदवारी न मिळाल्याची तक्रार आ. देवयानी फरांदे यांच्याकडे करीत असल्याचे दिसत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली. पाटील यांनी मात्र ध्वनिचित्रफितीत फेरफार करण्यात आल्याचा दावा करीत यामागे मनसेचे अविनाश अभ्यंकर असल्याचा थेट आरोप केला. यासंदर्भात आपण अभ्यंकर यांच्याशीही बोललो. उमेदवारी न मिळण्यात आपणावर खरोखरच अन्याय झाला असला तरी आपण दहा लाख रुपये दिलेले नाहीत. संबंधित ध्वनिचित्रफितीसंदर्भात आपण इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून यामागे जे असतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. दुसरीकडे, मनसेचे संपर्क प्रमुख अविनाश अभ्यंकर यांनी पाटील यांचे आरोप खोडून काढत दोन दिवसांपासून आपण मुंबईत असल्याचे निदर्शनास आणले. पाटील हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी सर्वप्रथम ही ध्वनिचित्रफीत कोणी काढली, कोण पसरवीत आहे, याची चौकशी करावी. आपणाकडे असा प्रकार करण्याइतपत वेळही नाही. हा खोडसाळपणा मनसेचा एकही कार्यकर्ता करणार नाही. या पक्षासंदर्भात एक ध्वनिचित्रफीत याआधीही पसरविण्यात आली. निवडणूक आयोगानेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे अभ्यंकर यांनी नमूद केले.