पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना नगरसेवकांनी आपले महिनाभराचे मानधन पक्षप्रमुखांच्या स्वाधीन केल्यानंतर आता सत्ताधारी भाजपने आपल्या नगरसेवकांच्या मानधनाची नऊ लाख १० हजार ९०० रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली आहे. महाजनादेश यात्रेनिमित्त नाशिकला आलेल्या मुख्यमंत्र्यांकडे हा धनादेश महापौर रंजना भानसी यांनी सुपूर्द केला.

ऑगस्ट महिन्यात राज्यातील अनेक भागांस महापुराचा तडाखा बसला. सांगली, कोल्हापूर भागांत पुरामुळे मोठे नुकसान झाले. कोकणासह विदर्भातील काही भागांत पुरामुळे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी भाजप नगरसेवकांनी एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला. सेना नगरसेवकांनी आपल्या मानधनाची रक्कम यापूर्वीच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पक्षप्रमुखांकडे दिली आहे.

भाजपचे महापालिकेत एकूण ६६ नगरसेवक असून संबंधितांच्या महिनाभराच्या मानधनाची नऊ लाख १० हजार ९०० रुपये इतकी रक्कम आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये झाला. या वेळी उपरोक्त धनादेश महापौर भानसी यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. या वेळी आमदार सीमा हिरे, सभागृह नेते सतीश सोनवणे उपस्थित होते.