भाजपची शिवसेनेवर टीका

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, यावर ‘आमचं ठरलंय’ असे वरिष्ठ पातळीवर भाजप-शिवसेनेचे नेते सांगत असले तरी स्थानिक पातळीवर नमतं न घेण्याविषयी धुसफुस सुरूच आहे. कोणी किती दावे-प्रतिदावे, कल्पनाविलास केला तरी पुढील मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांच्या वक्तव्याचे पडसाद २४ तासांच्या आत उमटले. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचे फलक भाजप कार्यालयासमोर तसेच सभोवतालच्या रस्त्यांवर झळकले. पोलिसांनी तातडीने हे फलक हटविले. फलकबाजीच्या प्रकारास भाजपने बालिशपणा म्हटले. दुसरीकडे हे उपद्व्याप सेना पदाधिकाऱ्यांच्या अंगलट आले. वरिष्ठांकडून स्थानिकांना फटकारले गेल्याने संबंधितांनी मौन बाळगणे पसंत केले.

राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होईल, याविषयी उभय पक्षांचे नेते ‘आमचं ठरलंय’ हे एकच उत्तर देत आहेत. जे ठरलंय, ते वेळ आल्यावर जाहीर होईल, असे सांगून सावध पवित्रा घेणाऱ्या सेना-भाजपमध्ये तोच वादाचा विषय झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, सोमवारी भाजपच्या संघटनात्मक कार्याचा आढावा सरोज पांडे यांनी घेतला. या बैठकीनंतर त्यांनी राज्याचा पुढील मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचा दावा केला. त्यांच्या या दाव्याला शिवसेनेने फलकाद्वारे प्रत्युत्तर दिले. एन. डी. पटेल रस्त्यावर भाजपचे कार्यालय आहे.

मंगळवारी सकाळी या कार्यालयासमोर शिवसेनेचा भलामोठा अवैधरीत्या लावलेला फलक झळकला. ‘मुख्यमंत्री युतीचा होणार, याचा अर्थ शिवसेनेचा होणार’ असा दावा त्यातून केला गेला. याच स्वरूपाचे काही फलक भाजप कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर लागले होते.

समाजमाध्यमावर या फलकबाजीची छायाचित्रे

पसरली. फलकांमुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी काही वेळात ते काढले. सेना पदाधिकाऱ्यांच्या फलकबाजीवर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठ नेत्यांमध्ये होणार आहे. त्यावर स्थानिक पातळीवरील नेत्यांनी बोलणे अयोग्य आहे. फलकबाजीद्वारे सेनेने बालिशपणाचे दर्शन घडविल्याचे टीकास्त्र भाजपने सोडले.

या घटनेनंतर सेनेच्या स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मौन

बाळगले. अनेकदा संपर्क साधूनही त्यांनी बैठकीत असल्याचे कारण देत प्रतिक्रिया देणे टाळले. फलकबाजीमुळे नेत्यांनी संबंधितांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे सांगितले जाते. यामुळे स्थानिक पदाधिकारी त्या विषयावर बोलण्यास तयार नव्हते. महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे यांनी बैठकीचे कारण देत बोलणे टाळले.

हा तर बालिशपणा..

विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय भाजप-शिवसेनेचे वरिष्ठ नेते घेणार आहेत. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी त्यावर बोलणेही योग्य नाही. या स्थितीत शहरातील भाजपच्या कार्यालयासमोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली फलकबाजी हा बालिशपणा आहे. सेनेच्या स्थानिक नेत्यांना त्याबद्दल अवगत करण्यात आले आहे.

– आमदार बाळासाहेब सानप  (शहराध्यक्ष, भाजप)

 

शहरातील भाजप कार्यालयासमोर आणि सभोवतालच्या रस्त्यावर शिवसेनेच्या नावाने असे फलक झळकले.