प्रदेश कार्यकारिणीची बैठक

जायकवाडीला पाणी सोडल्यापासून ते मराठवाडा-विदर्भासंबंधीच्या विधानामुळे महिला मेळावा उधळण्याच्या घटनेपर्यंत मित्रपक्ष शिवसेनेसह मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून सातत्याने टिकेचे धनी ठरलेल्या भाजपने आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत २ व ३ एप्रिल या कालावधीत येथे प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे सर्व मंत्री तसेच केंद्रीय मंत्रीही नाशिकमध्ये दाखल होत आहेत. शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात ठेवण्यासाठी सेना-भाजपमध्ये आटोकाट प्रयत्न होत आहे. वर्षभरावर आलेल्या पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे श्री स्वामी नारायण मंदिरात आयोजन केले.

पहिल्या दिवशी प्रदेश कार्यकारिणीची तर दुसऱ्या दिवशी प्रदेश कार्य समितीची बैठक होईल. शनिवारी सायंकाळी सहा वाजता यशवंतराव महाराज पटांगणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. याच दरम्यान पक्षाच्या विभागीय कार्यालयाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे.

बैठकीस प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, कृषि मंत्री एकनाथ खडसे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश महाजन, केंद्रीय सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, हंसराज अहिर, पीयुष गोयल यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, सर्व खासदार व आमदार असे एकूण ९०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.