शरद पवार यांचे टीकास्त्र

जळगाव : राज्यातील सध्याचे भाजप सरकार हे शेतीत कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल पाहणारे आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल नाही. यामुळे भाजपच्या हाती पुन्हा सत्ता देऊ नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.

पारोळा येथे एरंडोल मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. सतीश पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार यांनी राज्यातील भाजप सरकारवर कडाडून टीका केली. सध्याचे सरकार शेतीमालास चांगला भाव देईल का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. दरवर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हाल होतात. यंदा भाव बरे असल्याने थोडे समाधानकारक चित्र निर्माण झाले होते. मात्र, केंद्र सरकारने लगेच कांद्यावर निर्यात बंदी लादली. शिवाय घरात आणि चाळीत किती कांदा साठवायचा त्याच्यावर बंधने आणली. शेतमालाचे भाव वाढल्यावर लगेच अस्वस्थ होणारे सरकार बियाणे, खते, औजारे, किटकनाशके यांच्या किंमती वाढल्याचा विचार का करीत नाही,  या संकटावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज सरकारला का वाटत नाही? याकडे पवार यांनी लक्ष वेधले.