News Flash

हेमंत शेट्टीचे नगरसेवकपद अखेर वाचले

स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करत सभा तहकूब करण्यात आली होती.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतून कारागृहात निघालेल्या संशयित हेमंत शेट्टीला निरोप देण्यासाठी काही नगरसेवकही असे बाहेर पडले.

भाजपची धडपड अखेर कारणी

हेमंत शेट्टीचे नगरसेवकपद वाचविण्यासाठी आदल्या दिवशी महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्याच्या सत्ताधारी भाजपच्या धडपडीवर अखेर शिक्कामोर्तब झाले. या तहकूब सभेचे कामकाज मंगळवारी झाले. खुनाच्या प्रकरणात कारागृहात असणाऱ्या भाजप नगरसेवक शेट्टीने न्यायालयाच्या परवानगीने सहा महिन्यांत प्रथमच सभेला हजेरी लावल्याने त्याचे पद वाचले आहे. सहा महिने अनुपस्थितीच्या कारणावरून शेट्टीचे पद धोक्यात आले होते.

सोमवारी तहकूब झालेल्या सर्वसाधारण सभेचे कामकाज दुसऱ्या दिवशी महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. आदल्या दिवशी स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करत सभा तहकूब करण्यात आली होती. त्यामागे हेमंत शेट्टीचे धोक्यात आलेले नगरसेवकपद वाचविणे हे कारण असल्याची वंदता होती. त्यात तथ्य असल्याचे शेट्टीच्या उपस्थितीने स्पष्ट झाले. पंचवटीतील ज्वाल्या ऊर्फ जालिंदर उगलमुगले याच्या खून प्रकरणात गेल्या मेमध्ये भाजप नगरसेवक शेट्टीला अटक झाली होती. तेव्हापासून कारागृहात असलेला शेट्टी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिला नव्हता.

महापालिका अधिनियमान्वये एखादा सदस्य कोणत्याही कारणास्तव सहा महिन्यांहून अधिक काळ सभेला अनुपस्थित राहिल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होऊ शकते. या पाश्र्वभूमीवर, शेट्टीने महापालिकेच्या सभेत उपस्थित राहण्यास परवानगी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने त्याची मागणी मान्य करत तीन वाजेपर्यंतचा कालावधी दिल्याचे सांगितले जाते. त्यानुसार दुपारी नाशिक रोड कारागृहातून पोलीस बंदोबस्तात शेट्टीला महापालिका मुख्यालयात आणण्यात आले. तेव्हा शेट्टीच्या प्रभागातील सहकारी नगरसेवकाने त्याच्याशी संवाद साधल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. तो नगरसेवक शेट्टीला सभागृहात घेऊन आला. तत्पूर्वी, शेट्टीने हजेरी पुस्तकावर स्वाक्षरी केली. शेट्टीच्या आगमनाने सभागृहातील वातावरण बदलले.

विषयपत्रिकेत प्रभाग क्रमांक चारमध्ये एलईडी दिवे बसविणे, भुयारी गटार योजनेचे काम, वाल्मीकनगरमधील पालिका दवाखान्याचा वरचा मजला बांधणे, वाघाडी नदीस संरक्षक भिंत अशा काही शेट्टीने पत्राद्वारे दिलेल्या प्रस्तावांचा अंतर्भाव होता. या संदर्भात त्याला बोलण्याची परवानगी देण्यात आली. आपल्या प्रभागातील संबंधित प्रस्ताव मंजूर करावे, अशी मागणी त्याने केली. यावर महापौरांनी थेट भाष्य न करता केवळ मान हलवून संमती दर्शविली. न्यायालयाने शेट्टीला तीन वाजेपर्यंत बसण्याची परवानगी दिली होती. तासभर सभागृहात बसल्यानंतर तो बाहेर निघाला. ही बाब त्याच्या प्रभागातील इतर भाजप नगरसेवकांच्या लक्षात आली. सभागृहाचे कामकाज सुरू असताना भाजपचे दोन आणि मनसेचा बाहुबली एक असे तीन नगरसेवक शेट्टीला निरोप देण्यासाठी बाहेर आले. पोलीस बंदोबस्तात शेट्टीची पुन्हा कारागृहात रवानगी झाली. नोव्हेंबरमधील सभेला हजेरी लावल्याने धोक्यात सापडलेले त्याचे नगरसेवकपद वाचले आहे.

गुन्हेगारासाठी भाजपचा आटापिटा

देशात, राज्यात आणि महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने खुनाच्या प्रकरणातील संशयिताचे नगरसेवकपद वाचविण्यासाठी केलेला आटापिटा यावर पालिका वर्तुळात वेगवेगळी चर्चा होत आहे. महापाालिका निवडणुकीआधी भाजपने पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्या प्रकरणातील संशयित माजी नगरसेवक पवन पवारला पक्षात मानाचे स्थान दिले होते. त्यावरून बराच गदारोळ उडाला. त्याला तिकीट देण्याचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न अखेरच्या क्षणी फोल ठरला. पक्षाने त्याला तिकीट नाकारले. हेमंत शेट्टीचे मात्र, तसे झाले नाही. कधीकाळी भुजबळांचा कट्टर समर्थक म्हणून शेट्टीची ओळख होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शेट्टी भाजपच्या गोटात शिरला. महापालिका निवडणुकीत तिकीट मिळवून निवडून आला. बहुमतात असणाऱ्या भाजपचे त्याच्याबद्दलचे ममत्व महासभेतील घडामोडींवर लक्षात येते. एखाद्या संशयित गुन्हेगारासाठी इतकी धडपड करणारा पक्ष शहरवासीयांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचा असा विचार करणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 12:59 am

Web Title: bjp hemant shetty saved corporator post
Next Stories
1 ‘पालिका-पुरातत्त्व’च्या वादात वस्तुसंग्रहालय दुर्लक्षित
2 पुन्हा एकदा ओबीसींना काँग्रेसचे पाठबळ देणार
3 द्राक्षे ‘भाव’ खाणार!
Just Now!
X