भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कबुली

नाशिक : कधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांची भेट घेतात, तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधानांना भेटतात. राजकीय वर्तुळातील या भेटीगाठींमुळे आपलाही गोंधळ झाल्याची कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. या स्थितीवर दिल्लीतील दोन नेते लक्ष ठेवून आहेत. राज्य सरकारने इंधनावरील प्रति लिटर १० रुपये कर कमी केल्यास आपण केंद्राकडे कपातीसाठी आग्रह धरू, असे त्यांनी सांगितले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, दोन दिवसीय दौऱ्यात पाटील यांनी शहरातील पक्षाचे लोकप्रतिनिधी ते मंडल अध्यक्ष अशा सर्व घटकांशी वैयक्तिक चर्चा केली. इंधनाच्या वाढत्या दराच्या मुद्दय़ावर राज्य सरकारने करात कपात करण्याचा सल्ला त्यांनी दिला. केंद्र सरकारला इंधनावर प्रक्रिया, वाहतूक आणि तत्सम खर्च असतो. राज्याला तसा कुठलाही भार नसतो. त्यामुळे आधी राज्याने लिटरला १० रुपये कपात करावी. मग आम्ही केंद्र सरकारकडे कपात करण्याविषयी मागणी करू, असे त्यांनी सांगितले.

मुंबईतील दुर्घटनेविषयी त्यांनी दु:ख व्यक्त के ले. शहरात गर्दी वाढली आहे. डोंगर उतार वा तत्सम जागांवर लोकांनी घरे बांधली. कारवाई करायला गेल्यास नागरिक स्थगिती मिळवतात. दुर्घटना घडू नये म्हणून महापालिका प्रशासनाबरोबर नागरिकांनी जागरूक असायला हवे, असे त्यांनी नमूद के ले. नाशिक शहरात कुठलेही संघटनात्मक बदल होणार नाही. नाशिकमध्ये गट-तट असले तरी कुणी नाराज नाही. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जयकुमार रावल नाशिकची जबाबदारी सांभाळतील, असे पाटील यांनी सांगितले.

मनसे-भाजपमध्ये जवळीक

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नाशिक दौऱ्यावर आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची रविवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात धावती भेट झाली. परप्रांतीयांबाबत आपल्या भूमिकेचा विपर्यास केला जात असल्याचे राज यांनी आपणास सांगितल्याचे पाटील यांनी नमूद केले. मनसेने परप्रांतीयांविरोधातील भूमिका बदलली तर भाजप त्यांना सोबत घेऊ शकतो. राज हे आश्वासक आहेत. युतीबाबतचा निर्णय पक्षीय पातळीवर विचारांती होईल. भेटीत तशी कुठलीही चर्चा झालेली नाही. महापालिकेची निवडणूक पक्षाने स्वबळावर लढविण्याची तयारी केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.