पुरेसा साठा देण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आश्वासन

नाशिक :  जिल्हा करोनाच्या विळख्यात सापडला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन असमर्थ ठरत असतांना जिल्ह्य़ातील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी आणि नेत्यांनी गुरूवारी मुंबई येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या दिला. जिल्ह्य़ास प्राणवायू आणि रेमडेसिविरचा पुरवठा पुरेशा प्रमाणात करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

करोना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही. जिल्ह्य़ास अल्प प्रमाणात रेमडेसिविरचा पुरवठा होत असल्याने अनेक रुग्णांना इंजेक्शन मिळत नाही. जिल्ह्यसाठी १२५ मेट्रिक टन प्राणवायूची गरज असतांना सरासरी ७० मेट्रिक टनच मिळत असल्याने अनेक रुग्णांचा प्राणवायूअभावी मृत्यू होत असल्याचे भाजप लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महापौर सतीश कुलकर्णी, खासदार डॉ भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, स्थायी समिती सभापती गणेश गीते, भाजप सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, शहराध्यक्ष गिरीश पालवे , संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव यांनी गुरूवारी मुंबई येथे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सचिव विजय सौरभ यांची भेट घेत चर्चा के ली.

नाशिक जिल्ह्यतील परिस्थितीची त्यांना माहिती दिली. जोपर्यंत या समस्येवर योग्य तोडगा निघत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका महापौर सतीश कुलकर्णी आणि शिष्टमंडळाने घेतली. त्यावर नाशिकसाठी १०० मेट्रिक टन  प्राणवायू आणि सुमारे दोन हजार रेमडेसिविर इंजेक्शन नाशिक जिल्ह्यस देण्याचे लिखित स्वरूपात आश्वासन देण्यात आले.

ही चर्चा सुरु असतांनाच संबंधित विभागाचे आयुक्त परिमल सिंग , उपआयुक्त विजय वाघमारे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह शिष्टमंडळाची दृकश्राव्य बैठक घेण्यात आली.

पाटील यांनी शहरातील प्राणवायू आणि रेमडेसिविरविषयीची आकडेवारी सादर केली. सभागृहनेते सतीश सोनवणे यांनी शहरातील खासगी रुग्णालयांची  गरज पूर्ण करण्याची मागणी केली. शिष्टमंडळाने जिल्ह्यतील रुग्णांसाठी वाढीव रेमडेसिविर आणि प्राणवायूचा साठा उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन घेतले. यामुळे नाशिक जिल्ह्यतील अनेक रुग्णांची हेळसांड थांबणार असल्याचा दावा भाजपच्या लोकप्रतिनिधींनी के ला.