विविध प्रकरणांमुळे अडचणीत सापडलेले राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पाठीशी पक्ष उभा राहणार काय, या प्रश्नावर भाजपच्या स्थानिक खासदारांसह पदाधिकाऱ्यांनी सावध भूमिका स्वीकारली आहे. मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली. या काळात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपल्या कामांची यादी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सादर केली. या वेळी खडसेंबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नावर स्थानिक आमदारांनी स्पष्ट बोलण्याचे टाळले, तर खा. चव्हाण यांनी पक्षाकडून खडसेंवर कारवाई झाल्यास त्याचा कळत नकळत फटका बसू शकतो, हे मान्य केले.

भाजपचे ज्येष्ठ नेते खडसे हे सध्या वादग्रस्त प्रकरणांमुळे अडचणीत आले आहेत. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव हा त्यांचा बालेकिल्ला. नाशिकमध्ये पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत. यामुळे पत्रकार परिषदेत या अनुषंगाने प्रश्न उपस्थित झाल्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अतिशय सावधपणे उत्तरे दिली. पक्ष त्यांच्या पाठीशी राहणार काय, यावर आ. बाळासाहेब सानप यांनी फारसे बोलण्याचे टाळले. खा. चव्हाण यांनी मागील ४० वर्षांपासून खडसे हे पक्षात ज्येष्ठ नेते म्हणून काम करत असल्याचे सांगितले. उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी काम केले आहे. कारवाईचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडून होईल, तो स्थानिक पातळीवरील विषय नाही; परंतु खडसे यांच्यावर कारवाई झाल्यास कळत नकळतपणे पक्षाला त्याचा फटका बसू शकतो, ही बाब चव्हाण यांनी नमूद केली.  दरम्यान, मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दोन केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हय़ात मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांच्यासह अन्य एक मंत्री त्यास उपस्थित राहणार असल्याचे खा. चव्हाण यांनी सांगितले. लोकसभेत आजवर केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३४६ तारांकित व अतारांकित प्रश्न उपस्थित केले. कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून बाहेर काढणे, त्यास प्रति क्विंटल दोन हजार रुपये हमी भाव द्यावा आणि कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी किमान निर्यात मूल्य कमी करावे याकरिता लोकसभेत कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले. मतदारसंघात नाशिक-पेठ राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी, साक्री-सटाणा-चांदवड-मनमाड-येवला-कोपरगाव-अहमदनगर या ३०८ किलोमीटरच्या रस्त्याला मान्यता, दिंडोरी येथे कृषी महाविद्यालयासाठी पाठपुरावा, राष्ट्रीय महामार्गावर ओझर, वडाळीभोई व उमराणे येथे भुयारी मार्ग, रेल्वे मार्ग मंजुरी व सर्वेक्षण आदी कामे केल्याचे खा. चव्हाण यांनी सूचित केले.