नागरिक आर्थिक संकटात; ५० टक्के सवलत देण्याच्या मागणीसाठी भाजप रस्त्यावर

नाशिक : करोनाकाळात ग्राहकांना दिलेली भरमसाट वीज देयके मागे घ्यावी, या मागणीसाठी शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या भागांतून पदयात्रा काढून महावितरणच्या मुख्यालयावर धडक दिली. टाळेबंदीत नागरिकांच्या उत्पन्न स्रोत कमी झाला असताना अव्वाच्या सव्वा देयके देऊन त्यांना आर्थिक संकटात लोटल्याची तक्रार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मूळ देयकांमध्ये ५० टक्के सवलत देण्याची मागणी करण्यात आली.

करोनाच्या टाळेबंदीत शहरात घरोघरी वीज मीटरची नोंद न घेता सरासरी वीज देयकांचे वितरण झाले. टाळेबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रत्यक्ष नोंदणीनुसार वीज देयकांचे वितरण झाल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. तथापि, आधीची सरासरी वीज देयके आणि प्रत्यक्ष नोंदणीची देयके यामध्ये कमालीचा फरक आहे. यामुळे नागरिकांवर मोठा बोजा टाकला गेल्याची तक्रार होत आहे. या प्रश्नावरून भाजपही मैदानात उतरली आहे. या अनुषंगाने भाजपच्या वतीने सोमवारी सुरक्षित अंतराचे पथ्य पाळून पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये भाजप सिडको मंडल दोनच्या वतीने सकाळी पवननगर, त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉल या पदयात्रेचा समावेश होता.

महावितरण, राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सिटी सेंटर मॉल येथे वीज देयकांची होळी करण्यात आली. नंतर मार्ग क्रमांक दोनची पदयात्रा सुरू झाली. महापौर सतीश कुलकर्णी शहराध्यक्ष गिरीश पालवे, मंडळ अध्यक्ष अविनाश पाटील, देवदत्त जोशी असे भाजपचे मोजके पदाधिकारी सहभागी झाले. स्थानिक नागरिकांनी पदयात्रेचे स्वागत करत वाढीव देयकांविषयी आपला रोष प्रगट केला. द्वारका, काठे गल्ली सिग्नल, उपनगर येथून भाजपचे पदाधिकारी बिटको चौकातील विद्युत भवनवर धडकले. पदाधिकाऱ्यांच्या पदयात्रेत त्यांची वाहने मागून सहभागी झाली.

महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. अवास्तव, वाढीव वीज देयकांची आकारणी कमी करून सुधारित देयके देण्याची मागणी करण्यात आली. मुळात या पद्धतीने वाढीव वीज

देयके देताना कायदा, नियमांचे पालन झाले का, इतकी दरवाढ कशी झाली, महिनावार स्वतंत्र देयके द्यावीत, अशी मागणी करण्यात आल्याचे श्हराध्यक्ष गिरीश पालवे यांनी सांगितले. करोनामुळे नागरिकांचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे मूळ वीज देयकात ५० टक्के सवलत देण्याची मागणी भाजपने केली आहे.