नाटय़मय घडामोडींमुळे कलाटणी, निवडणूक बिनविरोध, महाविकास आघाडीचे समीकरण फिस्कटले  

फोडाफोडी, तडजोडी अशा विविध कारणांनी प्रारंभी अतिशय चुरशीच्या भासणाऱ्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात नाटय़मय घडामोडींमुळे कलाटणी मिळाली आणि निवडणूक बिनविरोध पार पडली. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांची महापौरपदी तर भिकूबाई बागूल यांची उपमहापौरपदी निवड झाली. राज्यात आकारास येणारे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाविकासआघाडीचे समीकरण स्थानिक राजकारणात फिस्कटले.

भाजपच्या खेळीमुळे सत्ता काबीज करण्याचा दावा करणाऱ्या सेनेवर माघारीची नामुष्की ओढवली. इतर पक्षांची वेगळी अवस्था नाही. सेनेला जाऊन मिळालेले भाजपचे बंडखोर स्वगृही परतले. मनसेने भाजपला मतदानासाठी पक्षादेश काढला. निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात घोडेबाजार झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा झाली. आठ ते १० नगरसेवक फुटल्याने भाजपला सत्ता कायम राखता येईल की नाही, अशी साशंकता व्यक्त केली जात होती. सेनेने विरोधकांची मोट बांधून भाजपला पायउतार करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. रंगतदार बनलेल्या निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात विलक्षण घडामोडी घडल्या. परिणामी, मतदानाद्वारे साधी लढतदेखील झाली नाही. भाजप, सेनेत महापौर पदासाठी स्पर्धा होती. भाजपकडून पाच, तर सेनेकडून चार जणांनी अर्ज दाखल केले होते. पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांनी ऐनवेळी आपल्या उमेदवारांचे नाव निश्चित केले. भाजपने महापौर पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी, उपमहापौर पदासाठी भिकूबाई बागूल तर शिवसेनेने विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि फुटीर गटाचे नगरसेवक कमलेश बोडके यांचे नाव निश्चित केले. भाजपच्या फुटीर गटाला उपमहापौरपद देऊन सेना चमत्कार घडविण्याच्या प्रयत्नात होती. त्यांचे मनसुबे भाजपने हाणून पाडले. पाच सदस्य असणाऱ्या मनसेने भाजपला मतदान करण्याचा पक्षादेश बजावला.

काँग्रेस उपमहापौर पदासाठी अडून बसली. सेनेचा फुटीर गटाचे समाधान करण्याचा मार्ग खुंटला. मनसे, काँग्रेसच्या भूमिकेमुळे महाआघाडीचे समीकरण बिघडले. यामुळे फुटीर नगरसेवकांनी पुन्हा भाजपचा मार्ग स्वीकारला. भाजपचे सर्व फासे योग्य पद्धतीने पडल्याने विरोधकांमध्ये निवडणूक लढविण्याचे बळ राहिले नाही.

महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, सत्यभागा गाडेकर, भाजपचे शशिकांत जाधव, दिनकर आढाव, भिकूबाई बागूल, गणेश गिते, कमलेश बोडके, काँग्रेसचे राहुल दिवे यांनी माघार घेतली. एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने सतीश कुलकर्णी यांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले. उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही तसेच घडले. उपमहापौर पदासाठी एकूण १० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. माघारीच्या मुदतीत सेनेचे विलास शिंदे, काँग्रेसचे शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील, राष्ट्रवादीचे सुफी जीन, भाजपचे गणेश गिते, अरुण पवार, अलका अहिरे यांनी माघार घेतली. यामुळे भाजपच्या भिकूबाई बागूल यांची बिनविरोध निवड झाल्याचे मांढरे यांनी जाहीर केले.

सत्ता राखण्यात यशस्वी झाल्याचा आनंदोत्सव भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांच्यासह लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून साजरा केला. उत्साही कार्यकर्त्यांनी ‘रामायण’ बंगल्यासमोर फटाके फोडले. आठ ते १० दिवस जंग जंग पछाडूनही समीकरण न जुळल्याने सेनेच्या नगरसेवकांनी उपमहापौर पदाच्या निवडणूक निकालाची प्रतीक्षा न करताच

सभागृह सोडले.

अखेरच्या टप्प्यात महाआघाडीचे समीकरण विस्कटले. बंडखोरी, नाराजीमुळे आव्हानात्मक स्थितीत असणाऱ्या भाजपने सर्व काही पद्धतशीरपणे जुळवून आणत विरोधकांना कात्रजचा घाट दाखवला.