शिवसेनेचा आरोप; मतदार यादीतून पावणे तीन लाख नावे वगळण्याची मागणी

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राजकीय पक्षांकडून तयारीला सुरूवात झाली आहे. गेल्यावेळी गाजलेल्या मतदार यादीतील दुबार नावांचा विषय यावेळी पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात दोन लाख ८७ हजारहून अधिक दुबार म्हणजे बनावट नावे घुसविण्यात आली. त्या बळावर भाजपचे तीन आमदार आणि महापालिकेत ६६ नगरसेवक निवडून आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. महापालिकेची निवडणूक पारदर्शी पध्दतीने पार पाडण्यासाठी ही नांवे त्वरित वगळण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली.

या संदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने  मुंबईत राज्य निवडणूक उपायुक्त अविनाश सणस यांची भेट घेऊन निवेदन दिले. नाशिकच्या पूर्व, पश्चिम आणि मध्य या तीन विधानसभा मतदार संघाच्या याद्यांत हेतूत: पावणेतीन लाखहून अधिक बनावट घुसविण्यात आल्याची तक्रार शिष्टमंडळाने केली. जिल्ह्याच्या मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर ही बाब निदर्शनास आली. त्याबाबतचे पुरावेही निवेदनाबरोबर जोडण्यात आले. सेनेच्या १० सदस्यांच्या पथकाने तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर हे पुरावे गोळा केले. त्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

नाशिक पश्चिम मतदार संघात सर्वाधिक १२२२४२, नाशिक पूर्वमध्ये ८८९३२ तर, नाशिक पूर्वमध्ये ७६३१९ दुबार (बनावट) नावे घुसविण्यात आली आहेत. त्याचाच फायदा घेऊन नाशकात भाजपचे तीन आमदार आणि ६६ नगरसेवक निवडून आले. परंतु, आगामी महापालिका निवडणुका पारदर्शी, निष्पक्ष आणि मोकळ्या वातावरणात व्हाव्यात, यासाठी ही दुबार नांवे या निवडणुकीच्या आत वगळावी, अशी मागणी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केली.

या बाबत नाशिकचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांनाही निवेदन देण्यात आले आहे. दिलेले पुरावे तपासून बघू आणि त्यात तथ्य आढळल्यास त्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन सणस यांनी दिल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. शिष्टमंडळात जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख बडगुजर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि गटनेते विलास िशदे यांचा समावेश होता.