मालेगाव : महापालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या मालमत्ता सर्वेक्षणामुळे नागरिकांवर करांचा वाढीव बोजा पडण्याची शक्यता असल्याने या सर्वेक्षणास भाजपतर्फे आक्षेप घेण्यात आला आहे. हे सर्वेक्षण त्वरित न थांबविल्यास महापालिकेविरोधात आंदोलन करण्याचा भाजपने दिला आहे.

महापालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यासाठी पालिकेतर्फे एका खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार या संस्थेतर्फे सर्वेक्षणाचे हे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, सर्वेक्षणाचे हे काम अनाठायी असून त्यामुळे शहरातील मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टी, पाणीपट्टीचा भार सहन करावा लागेल अशी भीती व्यक्त करत या सर्वेक्षणास भाजपने कडाडून विरोध सुरु केला आहे.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालिका उपायुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन देत हे सर्वेक्षण थांबविण्याचा आग्रह धरला. या सर्वेक्षण कामासाठी खासगी संस्थेस मोबदला द्यावा लागणार असल्याने महापालिकेच्या तिजोरीवर भुर्दंड पडणार आहे. सध्याच्या करोना संकटाला तोंड देतांना अनेक बाबींवरील खर्च वाढल्याने विकास कामांना कात्री लावावी लागली असताना सर्वेक्षणावरील अतिरिक्त खर्चाचा भडीमार कशासाठी, असा प्रश्न शिष्टमंडळाने उपस्थित केला.

सद्यस्थितीत करोना महामारीमुळे सर्वच घटकातील नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत संभाव्य वाढीव कर रकमेची मालमत्ताधारकांनी धास्ती घेतल्याचेही शिष्टमंडळाने यावेळी उपायुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. शिष्टमंडळात पक्षाचे उपाध्यक्ष हरिप्रसाद गुप्ता, जिल्हा सरचिटणीस देवा पाटील,नगरसेवक संजय काळे, प्रकाश मुळे, योगेश पाथरे आदींचा समावेश होता.