12 December 2019

News Flash

दांडी बहाद्दरांना घरचा रस्ता दाखवा 

महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहण्यामागील कारण संबंधितांना पत्र देऊन विचारावे.

नाशिक येथे भाजप सदस्यता नोंदणी अभियान जनजागृती मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे. समवेत आ. सीमा हिरे, शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी आदी. (छाया- यतीश भानू)

भाजप बैठकीत सरोज पांडे यांचे निर्देश

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, भाजपच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी येथे आयोजित बैठकीकडे भाजपच्या काही निमंत्रित पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. निवडक पदाधिकाऱ्यांना बैठकीला निमंत्रित करण्यात आले होते. त्यात शहरातील सात उपाध्यक्ष आणि सहा ते सात चिटणीसांनी पाठ फिरवली. याची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी गंभीर दखल घेतली. संबंधितांना पक्षाचे काम दुय्यम वाटत असल्यास नोटीस बजावून त्यांना घरचा रस्ता दाखवावा, असे निर्देश त्यांनी दिले.

भाजपच्या संघटन कार्याचा आढावा सोमवारी पांडे यांनी शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठकांमधून घेतला. यावेळी विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, महानगर अध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, चिटणीस लक्ष्मण सावजी, प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, आ.सीमा हिरे, महापौर रंजना भानसी आदी उपस्थित होते.

बैठकीस प्रदेश पदाधिकारी, शहरातील प्रमुख पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, युवा मोर्चासह अन्य विभागांचे अध्यक्ष अशा काही मोजक्याच मंडळींना निमंत्रित करण्यात आले होते. नगरसेवकांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. लोकसभा निवडणुकीनंतरचे वातावरण, भाजपच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी, सभासद नोंदणी अभियान आदींबाबत पांडे यांनी मार्गदर्शन केले. निमंत्रितांपैकी काही जण बैठकीत अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले. महानगर कार्यकारिणीवर कागदोपत्री १६ उपाध्यक्ष आणि १६ सचिव आहेत. त्यापैकी केवळ नऊ उपाध्यक्ष आणि तितकेच सचिव उपस्थित होते. महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहण्यामागील कारण संबंधितांना पत्र देऊन विचारावे. त्यांचे उत्तर समाधानकारक नसल्यास, त्यांना पक्षाचे काम दुय्यम वाटत असल्यास संबंधितांची तातडीने हकालपट्टी करावी, अशी सूचना पांडे यांनी केली.

विरोधी पक्ष कमकुवत असल्याने त्याचा लाभ उचलून त्यांच्यावर वार करण्याची एकही संधी सोडू नका. भाजपच्या ताब्यात असलेल्या शहरातील तिन्ही जागा आधीपेक्षा अधिक मताधिक्याने जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी मंडलनिहाय बुथरचना आणि सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला. घरोघरी जाऊन सदस्यता नोंदणी करतानाचे अनुभव मंडल अध्यक्षांकडून जाणून घेतले. प्रारंभी आमदार सानप यांनी बुथरचना आणि सदस्यता नोंदणी मोहिमेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी तयारी करा

भाजपचाच मुख्यमंत्री होण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी. युवा संमेलने भरवावीत. पर्यावरण संवर्धनावर अधिक भर द्यावा. त्यासाठी सदस्यता नोंदणीवेळी कुटुंबाला पाच रोपे द्यावीत, असा सल्ला पांडे यांनी दिला. बैठकीनंतर सदस्यता आणि नवमतदार नोंदणी अभियानाच्या प्रचार आणि प्रसारार्थ महानगरात फिरविण्यात येणाऱ्या जनजागृती रथाचा शुभारंभ पांडे यांच्या हस्ते करण्यात आला.

First Published on July 16, 2019 1:59 am

Web Title: bjp party workers remain absent in the meeting zws 70
Just Now!
X