News Flash

स्थायी समिती सदस्य नियुक्तीत भाजपचे धक्कातंत्र

स्थायी सभापती निवडणुकीचे भवितव्य या नियुक्तीवर अवलंबून आहे.

(संग्रहित छायाचित्र)

समितीची पुनर्रचना

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सदस्य निवडीत अखेरपर्यंत उत्कंठा कायम ठेवणाऱ्या सत्ताधारी भाजपने आठ ऐवजी सर्वच्या  सर्व १६ सदस्य नियुक्त करीत धक्कातंत्राचे दर्शन घडविले. त्यापैकी आठ सदस्य हे नव्याने नियुक्त केले आहेत. त्यातही भाजपसह विरोधी  शिवसेनेने आधीच्या काही सदस्यांना पुन्हा संधी दिली आहे. या  प्रक्रियेनंतर स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

स्थायी समिती सदस्य नियुक्तीसाठी बुधवारी सकाळी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा ऑनलाइन स्वरूपात पार पडली. महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर जाण्यासाठी सर्वपक्षीय इच्छुकांची संख्या मोठी होती. या समितीवर चार वर्षांपासून सत्ताधारी भाजपचे  वर्चस्व राहिले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार  भाजपचे संख्याबळ एका नगरसेवकामुळे घटणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षात समसमान संख्याबळ झाले आहे. यामु़ळे स्थायी समितीवर जाण्यास उत्सुक असणाऱ्यांची  संख्या मोठी होती. स्थायी समितीत आठ सदस्य नियुक्त करताना भाजपचा एक सदस्य कमी करून शिवसेनेचा एक सदस्य जास्त नियुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मागील नियुक्तीला आक्षेप आल्यामुळे संपूर्ण समितीची पुनर्रचना करण्यात आली.

स्थायी सभापती निवडणुकीचे भवितव्य या नियुक्तीवर अवलंबून आहे. या स्थितीत भाजप, शिवसेनेने ऐनवेळी यादी सादर करीत पक्षांतर्गत असंतोष उफाळणार नसल्याची दक्षता घेतली. सभेत प्रारंभी उच्च न्यायालयाच्या वकिलांनी दिलेला अभिप्राय वाचून दाखविण्यात आला. त्यानुसार स्थायीत भाजपचे आठ, शिवसेनेचे पाच, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे प्रत्येकी एक सदस्य यानुसार सदस्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे महापौरांनी जाहीर केले. दरम्यान, स्थायी सभापतीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

नियुक्तीनंतर भाजपचे आठ सदस्य लगेच सुरक्षितस्थळी रवाना झाले. महापालिकेत भाजपला मनसेकडून आजवर सहकार्याचा हात मिळाला. सभापती निवडणुकीत तो कित्ता गिरवला जाईल असे चित्र आहे. त्यामुळे सत्ताधारी-विरोधकांचे बलाबल समान असले तरी बहुमताचा आकडा गाठण्याचे नियोजन भाजप करीत आहे.

भाजपचे सदस्य

भाजपच्या नूतन सदस्यांमध्ये मावळते स्थायी सभापती गणेश गिते, माजी महापौर रंजना भानसी, स्थायी समितीच्या  माजी सभापती हिमगौरी आडके, योगेश हिरे, प्रतिभा पवार,  माधुरी बोलकर, इंदुबाई नागरे, मुकेश शहाणे या सदस्यांचा समावेश आहे.

विरोधी पक्षातील सदस्य

शिवसेनेकडून रत्नमाला राणे, ज्योती खोले, केशव पोरजे यांच्यासह याआधीचे सुधाकर बडगुजर आणि सत्यभामा गाडेकर हे पाच सदस्य नियुक्त करण्यात आले. मनसेच्या वतीने सलीम शेख, काँग्रेसकडून राहुल दिवे आणि राष्ट्रवादीतर्फे समिना मेमन यांना नियुक्त करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 12:26 am

Web Title: bjp push for appointment of standing committee members akp 94
Next Stories
1 एक हजार रुपये दंडाला काही नगरसेवकांचा विरोध
2 करोना चाचणीसाठी विभागनिहाय केंद्रे
3 मुखपट्टीविना फिरण्यास पसंती; करोनाविषयक नियमांकडे दुर्लक्ष
Just Now!
X