सुधारित नागरिकत्व कायदा महाराष्ट्रात लागू करावा. त्या विधेयकाला काँग्रेसचा विरोध आहे. शिवसेनेने लोकसभेत समर्थन केले अन् राज्यसभेत बचावात्मक पवित्रा घेतला. राज्यातील सरकार वाचवण्यासाठी सेनेने तडजोड करू नये. देशहितासाठी भाजप शिवसेनेशी राजकीय तडजोडदेखील करण्यास तयार आहे, असे भाजपचे नेते आशीष शेलार यांनी येथे सांगितले.

सुधारित नागरिकत्व कायदा देशहिताचा आहे. शिवसेनेने कोणालाही न घाबरता आपला मूळ बाणा दाखवावा असे आवाहन शेलार यांनी केले. काँग्रेसच्या भारत बचाव आंदोलनावर त्यांनी टीका केली. भारतात घुसलेल्या घुसखोरांना वाचवा ही काँग्रेसची भूमिका असून ते नाटक आहे. सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा हेतू कधीच नव्हता. राष्ट्र सर्वप्रथम हे भाजपचे धोरण आहे. उत्तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या १२ जागांवर भाजपचा पराभव झाला. पराभव नेमका का झाला, याची कारणे शोधून अहवाल तयार केला जाणार आहे. नाशिकच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ३० कोटींची मदत केली होती. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी या निधीला स्थगिती दिल्याचा आरोपही शेलार यांनी केला.

राम शिंदेंचे विखेंवर टीकास्त्र

इतर पक्षातून आलेल्या बडय़ा नेत्यांचा भाजपला काहीच फायदा झाला नाही. उलट नगर जिल्ह्य़ात राधाकृष्ण विखे यांना प्रवेश दिल्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या. त्याचा फटका बसल्याचे सांगत माजी मंत्री राम शिंदे यांनी विखेंवर टीकास्त्र सोडले. नगर जिल्ह्य़ावर वर्चस्व ठेवण्यासाठी विखे यांची आजवर हीच कार्यपद्धती राहिली. खोडय़ा काढण्याचे काम ते करतात. इतर कोणाला ते जिंकू देत नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी नगर जिल्ह्य़ात भाजपच्या पाच आणि इतर पक्षातून आलेले दोन आमदार अशा सात जागा झाल्या होत्या. निकालानंतर जागा वाढण्याऐवजी त्या तीनवर आल्या. भाजपचे उमेदवार पराभूत होण्यामागे विखेंचे राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.