नाराजी टाळण्यासाठी भाजप, शिवसेनेची दक्षता *  महापौर पदासाठी १३, तर उपमहापौर पदासाठी १० अर्ज

नाशिक : फोडाफोडी, तडजोडीच्या राजकारणामुळे सर्वाचे लक्ष लागलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी १३, तर उपमहापौर पदासाठी १० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सर्वसाधारण गटासाठी राखीव असलेल्या महापौर पदासाठी सत्ताधारी भाजप आणि विरोधी शिवसेनेत पक्षातंर्गत तीव्र स्पर्धा आहे. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपेपर्यंत कोणत्याही एका नावावर मतैक्य झाले नाही. अखेरीस महापौर पदासाठी भाजपने तीन, तर शिवसेनेच्या चार जणांना अर्ज दाखल करण्यास सांगितले. प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी संबंधित उमेदवाराचे नाव थेट सभागृहातच जाहीर केले जाणार आहे.

त्यावेळी अधिकृत उमेदवार वगळता इतरांना माघार घ्यावी लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, भाजपमधून दुरावलेल्या सानप गटाचे समर्थक मानले जाणारे कमलेश बोडके यांनी दोन्ही पदांसाठी, तर सुनीता पिंगळे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी संपुष्टात आली.

सत्ताधारी भाजपमध्ये महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी होती. ज्यांची नावे स्पर्धेत प्रारंभी आघाडीवर होती, ती नंतर मागे पडली. माजीमंत्री गिरीश महाजन यांनी नगरसेवकांशी चर्चा करूनही कोणत्याही एका नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. पक्षाचे आठ नगरसेवक फुटल्याचे गृहीत धरण्यात येत आहे. अशा स्थितीत अपेक्षित संख्याबळ गाठून देणाऱ्यास उमेदवारी दिली जाईल, असे मानले जात होते. आतापर्यंत कोणतेही पद न मिळालेले, आर्थिकदृष्टय़ा सक्षम नावाचा विचार होईल, अशी अटकळ होती. परंतु, भाजप अखेपर्यंत उमेदवार निश्चित करू शकला नाही. किंबहुना पक्षांतर्गत नाराजी उफाळून येऊ नये म्हणून नाव जाहीर न करण्याची दक्षता घेतली जात आहे. भाजपतर्फे सतीश कुलकर्णी, दिनकर आढाव, शशिकांत जाधव यांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले. संबंधितांचे अर्ज दाखल करताना प्रदेश पदाधिकारी सुनील बागूल, महानगरप्रमुख गिरीश पालवे उपस्थित होते.

भाजपप्रमाणे सेनेतही इच्छुकांची संख्या अधिक असल्याने सेनेकडून विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेता विलास शिंदे, सुधाकर बडगुजर आणि सत्यभामा गाडेकर यांनी अर्ज दाखल केले. याशिवाय भाजपच्या भिकूबाई बागूल, गणेश गिते यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करणाऱ्यांच्या यादीत काँग्रेसचे राहुल दिवे तसेच भाजपच्या फुटीर गटातील कमलेश बोडके यांचाही समावेश आहे.

उपमहापौर पदासाठी भाजपचे गणेश गिते, अरुण पवार, अलका अहिरे, भिकूबाई बागूल यांनी तर शिवसेनेच्या विलास शिंदे यांनी अर्ज दाखल केला. तसेच काँग्रेसकडून शाहु खैरे, डॉ. हेमलता पाटील, राष्ट्रवादीकडून सुफी जीन, भाजपच्या फुटीर गटाचे मानले जाणारे कमलेश बोडके आणि सुनीता पिंगळे यांनी अर्ज दाखल केले. हे अर्ज दाखल करताना माजी आमदार बाळासाहेब सानप, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी उपस्थित होते.

सानप गटाला काय?

महापालिकेवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी सरसावलेल्या शिवसेनेकडून भाजपच्या फुटीर गटाचे कसे समाधान केले जाते, याकडे सर्वाचे लक्ष आहे. सानप समर्थक मानले जाणारे कमलेश बोडके आणि सुनीता पिंगळे यांनी अर्ज दाखल केले. बोडके यांनी महापौर, उपमहापौर पदासाठी तर पिंगळे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले. संबंधितांच्या अर्जावर सूचक, अनुमोदक म्हणून भाजपपासून दुरावलेल्या नगरसेवकांची  स्वाक्षरी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, संबंधितांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह सेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी उपस्थित होते. या गटाला उपमहापौरपद दिले जाईल काय, यावर चौधरी यांनी संबंधितांनी तशा कोणत्याही अटी-शर्ती घातल्या नसल्याचे सांगितले. उमेदवार निश्चिती निवडणुकीच्या दिवशी होईल. शिवसेनेच्या चार जणांनी महापौरपदासाठी तर एकाने उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. जादुई ६१ पेक्षा अधिकचे संख्याबळ सेनेकडे आहे. मनसे महाआघाडीला पाठिंबा देणार आहे. मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी तसे सूचित केल्याचे चौधरी यांनी सांगितले.