छगन भुजबळ, सीटू, छावा संघटनेची मागणी

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना केली जात असेल तर जनता ते कदापि सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना अशक्य असून लेखकाने कुठल्या व्यक्तीची तुलना कोणाशी करत आहोत याचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे अशी प्रकाशने तसेच या पुस्तकांवर बंदी घातली पाहिजे, असे मत अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

दिल्लीतील भाजप कार्यालयात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकावरून स्थानिक पातळीवर तीव्र पडसाद उमटत आहेत. भुजबळ यांच्यासह सीटू, छावा संघटनांनी संबंधित पुस्तकावर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे.

शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य निर्माण केले होते. त्यांनी कधीही धर्मभेद किंवा जातिभेद केला नाही. त्यांच्याकडे काम करणाऱ्या सेनापतींमध्ये मुस्लीम सेनापतींची संख्या लक्षणीय होती. राज्यकारभार करताना शेतकऱ्यांच्या काडीला देखील हात लावता कामा नये अशी व्यवस्था होती. आज मात्र मोदी सरकारकडून व्यवस्था पायदळी तुडविली जात आहे. ते ज्या प्रकारे कायदे करत आहेत, त्यात जनहित नसून कुठल्या तरी एका विशिष्ट धर्माच्या विरोधात असल्याचे दिसत आहे. देशात विद्यर्थ्यांवर हल्ले होत आहेत. जेएनयूसारख्या नामांकित विद्यापीठात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही, असेही भुजबळ म्हणाले.

छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्हा प्रशासनाला निवेदन देत पुस्तकावर बंदी न घातल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय युगपुरुष आहेत. त्यांच्याशी तुलना होऊ शकणारा माणूस अजून जन्माला आला नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

सीटू संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी भगवान गोयल लिखित पुस्तिकेवर बंदी घालण्याची मागणी केली. नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना करणे हे बुद्धीच्या दिवाळखोरीचे लक्षण आहे. यातून शिवाजी महाराजांचा अपमान केला जात जात असून हे मुद्दाम केले जात आहे. हा संतापजनक प्रकार मराठी माणूस सहन करणार नाही, असेही डॉ. कराड यांनी म्हटले आहे.