‘स्मार्ट सिटी’च्या विषयावरून गवगवा होत असताना मागील काही महिन्यांत ४०पर्यंत पोहोचलेला शहरातील खुनांचा आकडा, अपहरण, खंडणी, दरोडे आणि लूटमारीचे प्रकार यामुळे नाशिककर हैराण झाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेवर असताना गुन्हेगारीवरून त्यांच्याविरोधात रान उठविणारे भाजपचे पदाधिकारी आणि तिघे आमदार सध्या मात्र या विषयावर मूग गिळून असताना शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी काय करावयास हवे हे खुद्द भुसे यांना सांगावे लागले.
शहर व जिल्ह्य़ातील वाढती गुन्हेगारी, दिवसागणिक वाढणारे दरोडे, हत्या अशा विविध घटनांमुळे नाशिकची प्रतिमा बदलत चालली आहे. पोलिसांचा कोणताही धाक उरला नसल्याने गुंडांना जणू काही मोकळीक मिळाली आहे. रस्त्यावर पोलीस कर्मचारी दिसत असले तरी अधिकारी मात्र कार्यालयातच बसून राहात असल्याने पोलीस आणि जनता यांच्यातील संबंध दुरावत चालले आहेत. शहरात सत्ताधारी भाजपचे तीन आमदार आहेत. परंतु, वाढत्या गुन्हेगारीविरोधात ते गप्प आहेत. गुंडगिरीला विरोध करण्याऐवजी उलट मागील काही महिन्यांत भाजपमध्ये गुंडांनाही पावन करून प्रवेश देण्यात येऊ लागल्याची उदाहरणे आहेत. दुसरीकडे, विरोधक म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीही या विषयावर शांतच आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुखबीर सिंग, पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते या प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. मागील पोलीस आयुक्तांच्या कार्यकालात गुन्हेगारी रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या बहुतेक उपाय योजना सध्या बंद आहेत. पोलीस अधिकारी रस्त्यांवर दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचे दर्शनही जनतेला होत नाही. या पाश्र्वभूमीवर भुसे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना काही निर्देश दिले. त्यात त्वरित शहरामध्ये ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ सुरू करावे, महाविद्यालय परिसरातील कट्टय़ांवर दिसणाऱ्या टवाळखोरांना ठिकाणावर आणावे, सर्वसामान्यांना पोलीस आपला मित्र आहे हे वाटण्यासाठी पोलीस ठाणे, तसेच वेगवेगळ्या वाडय़ा-वस्त्यांवर पोलिसांनी बैठका घ्याव्यात, सर्वसामान्यांशी संवाद साधून भयमुक्त नाशिकसाठी जलद कार्यवाही सुरू करावी, या निर्देशांचा समावेश आहे. बैठकीस आ. राजाभाऊ वाजे, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर हेही उपस्थित होते.