पदवीधर मतदारसंघ निवडणूक

विधान परिषद निवडणुकीसाठी नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील हे १६ जानेवारी रोजी, तर काँग्रेस, टीडीएफ व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे हे १७ जानेवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीआधी प्रमुख राजकीय पक्षांना सुशिक्षितांमध्ये असलेले आपले बळ अजमावून दाखविता येणार आहे.

३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर येथे भाजपची नियोजन बैठक झाली. या बैठकीत प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांनी भाजपचा हा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी आपले सर्वस्व पणास लावावे, असे आवाहन केले. भाजपचे डॉ. पाटील हे सोमवारी दुपारी १२ वाजता आपला उमेदवारी अर्ज नाशिकरोड येथे विभागीय आयुक्तांकडे दाखल करणार असून त्या वेळी विभागातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, नगर जिल्ह्य़ातील पक्ष कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे दर्शन घडेल, असा विश्वास सावजी यांनी व्यक्त केला. या वेळी उत्तर महाराष्ट्रातून २० हजारपेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप होते. व्यासपीठावर आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. अपूर्व हिरे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल आदी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरताना भाजपने आपली ताकद दाखवून देण्याची गरज या वेळी अपूर्व हिरे यांनी व्यक्त केली. सानप यांनी पक्षाच्या सूक्ष्म नियोजनाची माहिती दिली. उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पवन भगूरकर यांनी केले. आभार सुरेश पाटील यांनी मानले.

दुसरीकडे, काँग्रेस, टीडीएफ व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे हे मंगळवारी सकाळी ११ वाजता महसूल आयुक्तालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी भाई जगताप, आ. उल्हास पवार यांच्या उपस्थितीत नाशिकरोड येथील पाटीदार भवन येथे डॉ. तांबे यांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.