पालिकेच्या माघारीनंतर संत निवृत्तिनाथ पालखीला जिल्हा परिषदेचे साहाय्य

संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत आणि वारकऱ्यांना आवश्यक त्या वैद्यकीयसह तत्सम सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेने साडेसहा लाखाची तरतूद करीत एक प्रकारे महापालिकेला शह दिला. कोणत्याही सण, उत्सवासाठी निधी दिला जाणार नसल्याची भूमिका महापालिकेने घेतल्याने पालखीचे स्वागत करताना सत्ताधारी भाजपच्या लोकप्रतिनिधींची अवघडल्यासारखी स्थिती झाली. सेना नगरसेवकांनी सातपूर येथे स्वखर्चाने स्वागत केल्यानंतर जिल्हा परिषदेमार्फत तरतूद करण्यात राजकारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सातपूरहून मार्गस्थ झालेल्या संत निवृत्तिनाथ पालखीचे त्र्यंबक रस्त्यावरील पंचायत समिती आवारात आयोजित सोहळ्यात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी आ. बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, पालिका आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पालखी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. दरवर्षी महापालिकेच्या वतीने संत निवृत्तिनाथ पालखीचे त्र्यंबक रस्त्यावरील तरण तलाव परिसरात स्वागत केले जाते. महापालिकेने शासकीय परिपत्रकाचा हवाला देत कोणताही सण, उत्सवासाठी निधी देण्यास नकार दिल्याने सत्ताधारी भाजपची अडचण झाली. त्यांना कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी पुढाकार घेतला. सेना नगरसेवकांच्या मानधनातून खर्चाचे नियोजन केले. त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या पालखीचे सातपूर येथे उत्साहात स्वागत करण्यात

आले. शुक्रवारी सकाळी पंचायत समितीच्या आवारात स्वागत समितीच्या वतीने आयोजित सोहळ्यात जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे यांनी पालखी आणि वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी केलेल्या व्यवस्थेची माहिती दिली. यासाठी जिल्हा परिषदेने साडेसहा लाखाची तरतूद केली आहे. पालखीसमवेत संपूर्ण कालावधीत जिल्हा परिषदेचे वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका राहणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

महापौर रंजना भानसी यांनी यंदा काही कारणास्तव पालखीचे स्वागत करता आले नसल्याचे नमूद केले. सूत्रसंचालकाने आयुक्तांना मनोगत व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करताना नेमके त्या मुद्दय़ावर बोट ठेवले. आयुक्त मुंढे यांनी पालखी स्वागत समितीच्या भूमिकेविषयी समाधान व्यक्त केले. चंद्रभागा नदीच्या प्रदूषणाच्या मुद्दय़ावर त्यांनी बोट ठेवले. सोहळ्यात उपस्थितांनी वरुण राजाला साकडे घातले. महिना उलटूनही नाशिक जिल्ह्य़ात दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे नाशिकसह संपूर्ण देशात समाधानकारक पाऊस होऊन समृद्धी येऊ दे, असे साकडे घालण्यात आले. पालखीच्या स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने शिवसेनेने भाजपला खिंडीत गाठल्याचे पाहायला मिळाले.

हे तर संतपदाचे लक्षण

पालखी स्वागताच्या मुद्दय़ावरून मागील काही दिवस बरीच चर्चा सुरू होती. त्या वेळी स्वागत समितीने प्रतिक्रिया न देता शांत राहणे पसंत केले. हे संतपदाचे लक्षण असून शांत राहून यश मिळते ही संतांची शिकवण आहे. सोलापूर येथे कार्यरत असताना आपणास वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. पाण्यासह अनेक प्रश्न सोडविल्याची आठवण आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या वेळी करून दिली.