आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद तसेच महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, भाजपने पक्षातील महिलांचे सक्षमीकरण आणि संघटनासाठी पुढील काही दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात प्रशिक्षण वर्गासह अन्य महत्त्वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे. या माध्यमातून सरकारच्या महिलांविषयक असणाऱ्या योजना, पक्षाचे महिलाविषयक ध्येय धोरण याची माहिती देण्यात येणार असल्याचे भाजप महिला आघाडी अध्यक्ष अ‍ॅड. माधवी नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

येथील पक्ष कार्यालयात उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक, निवडणूक तयारी आदी विषयांवर महिला आघाडीची बैठक पार पडली. बैठकीनंतर अ‍ॅड. नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. आरक्षणात महिलांना संधी देताना निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न होणार आहे. महिला आघाडीने मागील निवडणुकीत आरक्षणाशिवाय निवडून येणाऱ्या ४२ महिलांची यादी पक्षाकडे दिली. त्यातील ३२ महिलांना प्रत्यक्ष निवडणूक लढविण्याची संधी दिली गेली. १२ महिला या निवडून आल्याची माहिती त्यांनी दिली.

महिला सक्षमीकरणासाठी अभ्यासवर्ग होणार असून आतापर्यंत पाच महापालिका क्षेत्रात हे वर्ग झाले. त्यात वॉर्ड किंवा प्रभागाची रचना, तेथील समस्या, विभागनिहाय माहिती, व्यक्तिमत्व विकास आदींवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. नाशिकने दोन महिला आमदार, १७ नगरसेविका दिल्या. सध्याच्या बैठकीने निवडणूक तयारीचा बिगूल वाजत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात तीन ते ११ ऑक्टोबर या कालावधीत ‘धोरण महिला सबलीकरणाचे, तोरण स्त्री शक्तीच्या सन्मानाचे’ हा अनोखा उपक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये शिक्षण, क्रीडा, सहकार, सामाजिक यासह अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा महिलांची जी शक्तिस्थळे आहेत त्यांच्या नावे सत्कार करण्यात येणार आहे. याच कालावधीत सरकारच्या योजना, धोरणे महिलांपर्यंत पोहचावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्या दृष्टीने प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. पक्षाच्या वतीने बचत गटाद्वारे महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न होणार आहे. आजवर बचत गटातील महिलांचा वापर हा राजकीय शक्तीसाठी झाला. भाजप एकमेव पक्ष जो या महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार आहे.

यासाठी स्कील इंडिया व मुद्रा योजनांचा वापर करत नेतृत्व सिध्द करणाऱ्या महिलांना संधी दिली जाईल. यामध्ये महिला आघाडी बचत गट आणि सरकार यामध्ये दुवा म्हणून काम करणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. यावेळी आ. सीमा हिरे, आ. प्रा. देवयानी फरांदे, भाजप शहर महिला आघाडीच्या रोहिणी नायडू उपस्थित होत्या.