त्र्यंबकेश्वर

मागील पाच वर्षांत सर्वपक्षीय खिचडीच्या राजकारणाला वैतागलेल्या त्र्यंबकेश्वरमधील मतदारांनी नगराध्यक्ष पदासह १७ पैकी १४ जागा जिंकून देत भाजपच्या हाती एकहाती सत्ता सोपविली. नगराध्यक्षपदी भाजपचे पुरुषोत्तम लोहगांवकर विजयी झाले. थेट नगराध्यक्षपद निवडणुकीत अपक्ष उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तिसऱ्या आणि चवथ्या क्रमांकावर फेकले गेलेले काँग्रेस, शिवसेना स्पर्धेतही नव्हती. नगरसेवकपदाच्या निवडणुकीत सेनेला दोन तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा आणि बारा जोतिर्लिगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरची नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी सर्वपक्षीयांनी कंबर कसली होती. निवडणुकीच्या तोंडावर अनेक नाटय़मय घडामोडी घडल्या. आपापल्या पक्षांच्या नगरसेवकांना थोपविणे सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांना अवघड गेले. निवडणुकीच्या तोंडावर इतकी पक्षांतरे झाली की, प्रभागनिहाय उमेदवारांची यादी जाहीर होईपर्यंत संभ्रमाची स्थिती होती. या निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. मतदारांनी मतदानात उत्स्फुर्त सहभाग नोंदविल्याने मतदानाची टक्केवारी ८४ पर्यंत गेली. मतमोजणीची प्रक्रिया सोमवारी नगरपालिका मुख्यालयात कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडली. प्रारंभीच्या काही फेऱ्यात निवडणुकीचा कल स्पष्ट झाल्यावर भाजपच्या गोटात जल्लोषाचे वातावरण पसरले. शिवसेना, काँग्रेसच्या उमेदवारांनी मतमोजणी केंद्रावरून काढता पाय घेण्यास सुरूवात केली. थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक भाजपने एकहाती जिंकली. भाजपचे पुरूषोत्तम लोहगांवकर यांनी अपक्ष उमेदवार बाळू झोले यांचा १२८६ मतांनी पराभव केला. लोहगांवकर यांना ३०५३ मते मिळाली. या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेनेची बिकट अवस्था झाली. काँग्रेसचे सुनील अडसरे (१७४७) तृतीय तर शिवसेनेचे धनंजय तुंगार (१३६८) चवथ्या क्रमांकावर राहिले. १७ जागांसाठी ५४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. १४ जागा जिंकून भाजपने नगरपालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. प्रभाग क्रमांक चारमध्ये एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार थोडक्यात पराभूत झाला. नातेवाईकांनी मते न दिल्याच्या मुद्यावरून त्या प्रभागात वातावरण तणावाचे झाले होते. निकाल जाहीर झाल्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.

नवनिर्वाचित नगरसेवक

१७ पैकी १४ जागांवर भाजपने विजय मिळविला. त्यामध्ये भाजपचे प्रभाग क्रमांक एकमधून भारती बदादे (७८३) अणि कैलास चोथे (८६२). प्रभाग दोनमध्ये विष्णू दोबाडा (४७१) आणि सायली शिखरे (४२८), प्रभाग तीनमध्ये त्रिवेणी तुंगार (अविरोध), प्रभाग चारमध्ये दीपक गीते (४७८), प्रभाग पाचमधून अनिता बागूल (६२५) आणि स्वप्नील शेलार (७९५), प्रभाग सहामधून सागर उजे (५२१) आणि माधवी भुजंग (६७४), प्रभाग सातमध्ये शीतल उगले (६०३), प्रभाग आठमधून संगिता भांगरे (७८८), शिल्पा रामायणे (६७९) आणि समीर पाटणकर (७६५) यांनी विजय मिळविला. शिवसेनेच्या कल्पना लहांगे (४३५) प्रभाग चारमधून तर प्रभाग सातमधून मंगला आराधी (५७९) या विजयी झाल्या. प्रभाग तीनमध्ये अपक्ष उमेदवार अशोक घागरे यांनी अवघ्या १३ मतांनी भाजपच्या उमेदवाराला पराभूत केले. घागरे यांना (२७६) मते मिळाली.

सटाणा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची सरशी

सटाणा येथील नगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच अ मधील चुरशीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे आघाडीच्या आशा भामरे यांनी भाजप-शहरविकास आघाडीच्या उमेदवार नर्मदा सोनवणे यांचा ४८ मतांनी पराभव केला. भामरे यांना ६६४ मते मिळाली. हा निकाल आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर, शहर विकास आघाडी,भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक काका सोनवणे, काँग्रेसचे नगरसेवक दिनकर सोनवणे, राहुल पाटील या त्रिकुटामुळे आशा भामरेंचा विजय झाला असून या विजयामुळे सटाणा शहर विकास आघाडी, भाजपला धक्का बसला आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक पाच अ हा अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीतून या प्रभागातून भाजपच्या लता सोनवणे या विजयी झाल्या होत्या. मात्र, त्यांना तीन अपत्य असल्याची तक्रार पराभूत उमेदवार निर्मला सोनवणे यांनी केली. या तक्रारीची शहानिशा होऊन मालेगावचे अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी लता सोनवणे यांना अपात्र घोषित केले. त्यामुळे या रिक्त झालेल्या पदासाठी रविवारी पोटनिवडणूक होवून सोमवारी मतमोजणी झाली. या पोटनिवडणुकीसाठी अनुसूचित जाती-जमातीच्या महिला राखीव गटातून भाजपने नर्मदा सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवतीने आशा सोनवणे यांच्यात सरळ लढत झाली. पालिका कार्यालयात झालेल्या मतमोजणीत भाजप आणि सटाणा शहर विकास आघाडीच्या उमेदवार नर्मदा सोनवणे यांना ५९६ मतांवर समाधान मानावे लागले तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे आघाडीच्या आशा भामरे यांना ६४४ मते मिळाल्याने त्या ४८ मतांनी विजय झाल्या. याच प्रभागामध्ये भाजपच्या लता सोनवणे वर्षभरापूर्वी विजयी झाल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकाची मते सटाणा शहर विकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती तर तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. मात्र तिसऱ्या अपत्यामुळे लता सोनवणे यांचे पद अपात्र झाले. पोटनिवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादीने बाजी मारल्याने भाजपसह सटाणा शहर विकास आघाडीला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा सूर उमटत आहे. या पोट निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विजयामागे पक्षाचे गटनेते काका सोनवणे, मनसेचे पंकज सोनवणे यांची व्यूहरचना महत्वाची ठरली. दोघा सोनवणे बंधूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. प्रभागातील गल्लीबोळ पिंजून काढली. त्याचे फळ निकालातून समोर आले.