सत्तेत आल्यास मुंबई महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक करू, असा डंका पिटणाऱ्या भाजप नेत्यांवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. नाशिकमध्ये भाजपा कार्यालयातच तिकीटासाठी पैशाची मागणी केली जात असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीसाठी पैसे घेऊन तिकीटवाटप करण्यात आल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. गेल्या दोन दिवसांत एबी फॉर्म वाटपाच्यावेळी शिवसेना आणि भाजपमधील कार्यकर्त्यांनी जाहीरपणे ही गोष्ट बोलूनही दाखवली होती. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या गोष्टीला पुष्टी मिळाली आहे. नाशिकमध्ये भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी जीवाचे रान करत असताना भाजपचे सरचिटणीस, काही कार्यकर्ते आणि कार्यालय सचिव अरूण शेंदूर्णीकर हे उमेदवारांकडून दोन-दोन लाख रूपये मागत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे पारदर्शक कारभाराची भाषा करणारा भाजप पक्ष अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता भाजपकडून पक्ष आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी ही रक्कम मागण्यात आल्याची सारवासारव करण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला होता. पक्ष कार्यालय, नेत्यांच्या घरासमोर इच्छुक उमेदवारांनी निदर्शने करुन पैसे घेऊन तिकीटे विकल्याचा आरोप केला होता. राजकीय पक्षांच्या या कार्यशैलीमुळे इच्छुकांमध्ये खदखदणाऱ्या असंतोषाचा भडका अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उडाला होता.  साधारणत: १० ते १२ दिवसांपूर्वी मुलाखत प्रक्रिया पार पाडणाऱ्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवारांची यादी जाहीर करताना धाबे दणाणले होते. यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही यादी जाहीर न करता अधिकृत उमेदवारांना थेट एबी फॉर्मचे वाटप करण्याचा पवित्रा बहुतांश पक्षांनी घेतला. ही प्रक्रिया शुक्रवारी सकाळी सुरू झाली.  आपला पत्ता कट झाल्याचे जसे ज्ञात होऊ लागले, तसे वातावरण बदलले. ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देणाऱ्या भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने यादी जाहीर करणे हे स्थानिक पदाधिकाऱ्यांसाठी त्रासदायक ठरले.  चिघळलेली स्थिती लक्षात घेऊन भाजपने यादी जाहीर न करता अधिकृत उमेदवारांना दूरध्वनी करून एबी फॉर्म नेण्यास सांगितले. याची माहिती समजल्यानंतर प्रभाग क्रमांक ३१ मधून इच्छुक असणाऱ्या शारदा दोंदे वसंत स्मृती पक्ष कार्यालयात पोहोचल्या. या ठिकाणी इच्छुकांची मोठी गर्दी होती. अनेकांनी २० लाख रुपये घेऊन स्थानिक नेत्यांनी तिकीट विकल्याचे आरोप केले. बाहेरून आलेल्यांना पक्षाने पैसे घेऊन सढळहस्ते तिकीट वाटप केले. या मुद्यावरून दोंदे यांनी शहराध्यक्षांवर सर्वासमक्ष आगपाखड केली. एकेरी शब्दात उल्लेख करत तिकीट न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिल्यावर सानप हे काही वेळात पक्ष कार्यालयातून बाहेर पडले. याच स्वरूपाचा संताप अन्य इच्छुकांनी व्यक्त केला होता.