अनिकेत साठे

विरोधी पक्षांमधून मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या भरतीची साथ लाभलेल्या भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये भव्य स्वरूपात करण्याची तयारी करण्यात आली आहे. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘रोड शो’ तर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. यानिमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत भाजप विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहे. शक्ती प्रदर्शनासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नियमावली घालून देण्यात आली आहे. गर्दी जमविताना शालेय-महाविद्यालयीन अर्थात गणवेशातील विद्यार्थ्यांचा समावेश करण्याऐवजी ज्येष्ठ नागरिक संघांचा पर्याय निवडण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहरात आयोजित ‘रोड शो’मध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा जिल्ह्य़ात ग्रामीण भागात झाली होती. यावेळी ती शहरात कुंभमेळ्यात साधू-महंत जिथे वास्तव्य करतात, त्या तपोवनमध्ये होणार आहे. लोकसभा प्रचारातील सभेचे सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित नियोजन केले होते. विधानसभा निवडणुकीत युतीवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. महाजनादेश यात्रेचा समारोप दिमाखात करण्याची जबाबदारी भाजप पदाधिकाऱ्यांवर आहे. मुख्यमंत्र्यांचा ‘रोड शो’ आणि पंतप्रधानांची सभा अशी दुहेरी जबाबदारी पेलण्यासाठी स्थानिक आमदार, इच्छुक आणि पदाधिकारी कामाला लागले आहेत. सभेला पाच लाखांपेक्षा अधिक गर्दी जमविण्याचा प्रयत्न आहे. पावसाची शक्यता गृहीत धरून खास भव्य मंडपांची उभारणी करण्यात आली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्या तयार करून शहर-ग्रामीण भागात बैठकांचे सत्र राबविले गेले. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांमध्ये मोठे संख्याबळ असून जिल्ह्य़ात चार आमदार आहेत. या राजकीय शक्तीचा पुरेपूर वापर केला जात आहे. दोन्ही कार्यक्रमांसाठी गर्दी जमविणे, हे महत्त्वाचे लक्ष्य. बैठकांमध्ये त्याचा आढावा घेऊन कानमंत्र दिला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी प्रचाराची मुदत संपण्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी रणरणत्या उन्हात शहरात सभा घेतली होती. त्यावेळी गर्दी जमविताना स्थानिकांची दमछाक झाली होती. सभा मंडपात महाविद्यालयीन विद्यार्थी गणवेशातच बसलेले दिसले होते. त्यापासून बोध घेत पंतप्रधानांच्या सभेत तसे होऊ दिले जाणार नाही. पदाधिकाऱ्यांना शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोणी स्वेच्छेने येणार असल्यास हरकत नाही. परंतु, मोठय़ा संख्येने गणवेशातील विद्यार्थ्यांना आणले जाऊ नये, असे बैठकांमधून सूचित करण्यात आले. विद्यार्थ्यांऐवजी ज्येष्ठ नागरिक संघांचा पर्याय सुचविला गेला. शहरात ६५ हून अधिक ज्येष्ठ नागरिक संघ कार्यरत आहेत. पंतप्रधानांचे भाषण प्रत्यक्ष ऐकण्यास ते उत्सुक असतील. त्यांच्यासाठी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन आहे. फडणवीस यांच्या ‘रोड शो’त तशीच दक्षता घेण्यात येणार आहे. मार्गावरील महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता केली जात आहे. त्याची जबाबदारी पालिकेतील पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या फेरीत वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊ दिले जाणार नाही. यात्रेतील रथ एकेरी मार्गातून जाणार नाही. त्यासाठी एका चौकात फेरा मारला जाणार आहे. दोन्ही कार्यक्रम यशस्वी करून शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न आहे.

महाभरतीतून उत्तर महाराष्ट्र दूर

तीन टप्प्यात राज्यातील बहुतांश मतदारसंघातून मार्गस्थ झालेल्या महाजनादेश यात्रेदरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेते, विद्यमान आमदार भाजपच्या गोटात दाखल झाले. परंतु, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र त्यास अपवाद राहिला. भाजपच्या महाभरतीत या भागातून कोणी आमदार किंवा मोठा नेता भाजपच्या गळाला लागला नाही. उलट काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेची वाट धरली. जळगावमध्ये एका जागेचा अपवाद वगळता सर्वच जागा युतीच्या ताब्यात आहेत. यामुळे तिथे फारसा प्रश्न नव्हता. धुळे, नंदुरबारमध्ये प्रत्येकी दोन तर नाशिकमध्ये सहा जागांवर विरोधी पक्षांचे आमदार आहेत. उर्वरित महाराष्ट्रात अनेक नेते भाजपकडे आकृष्ठ झाले. परंतु संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांचे अधिपत्य असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील विद्यमान आमदार किंवा मोठे नेते भाजपमध्ये गेले नाहीत. महाजनादेश यात्रेच्या समारोपात नव्याने काही भरती होईल काय, याकडे सर्वाचे लक्ष आहे.