१५ ऐवजी आता १० फूट उंचीच्या झाडांचा निकष

शहर हिरवेगार करण्यासाठी विविध भागात १५ फूट उंचीची १५ हजार १६० मोठी झाडे लावण्याच्या कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत महापालिकेने पावणे चार कोटींची सात कामे घेणाऱ्या तीन मक्तेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली. निकषानुसार या उंचीची झाडे उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे आता १० फूट उंचीच्या झाडांचा निकष ठेऊन नव्याने ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

मागील काही महिन्यांपासून वृक्ष लागवडीचा हा विषय गाजत होता. महापालिकेने १५ फूट उंचीची एकूण १५ हजार १६० झाडांची लागवड करण्यासाठी निविदा प्रसिध्द करून ही कामे ठेकेदारांना दिली गेली. तथापि, विहित मुदतीत ही कामे करण्यास संबंधितांना अपयश आले. तीन कोटी ६६ लाख रुपयांची ही सात कामे चार ठेकेदारांना देण्यात आली होती. एकाकी अथवा गटरोपण पध्दतीने लावण्यात येणाऱ्या झाडाच्या लागवडीनंतर एक वर्ष संवर्धनाची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर राहणार होती.

बराच काळ उलटूनही संबंधितांकडून काम केले जात नव्हते. या अनुषंगाने पालिकेने ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीसही बजावली. परंतु, काहींनी त्यास उत्तरही देण्याचे औदार्य दाखविले नाही. कामात कुचराई केल्याच्या कारणावरून महापालिकेने अर्जुन हरिचंद्र फापाळे, पाटील नर्सरी, निसर्ग इंटरप्रायजेस या मक्तेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली. त्यास पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दुजोरा दिला.

सिंहस्थात गोदावरीच्या काठावर याच पध्दतीने अधिक उंचीच्या झाडांची लागवड करत हा परिसर निसर्गरम्य बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शहरात जी एकूण वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, त्यातील काही झाडे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पर्यायी वृक्ष लागवडीची आहेत. नाशिक पश्चिम व पंचवटी विभागात ११६७, नवीन नाशिक व सातपूर विभागात ११६७ तसेच नाशिक पूर्व व नाशिकरोड विभागात ११६६ आणि नाशिक पूर्व विभागातील २९१५ झाडे लावण्याचे काम अर्जुन फापाळे या ठेकेदाराला मिळाले होते. नवीन नाशिक विभागात २९१५ व नाशिक पश्चिम विभागात २९१५ झाडे लावण्याची दोन कामे निसर्ग एंटरप्रायजेसला दिली गेली होती. सातपूर विभागात २९१५ झाडे लावण्याचे काम पाटील नर्सरीला दिले गेले. मुदतीत काम करण्यास अपयशी ठरलेल्या या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

दरम्यान, वृक्ष लागवड रखडण्यामागे १५ फूट उंचीचा निकष अडसर ठरला. इतक्या मोठय़ा संख्येने या उंचीची झाडे उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे महापालिकेने १५ फूट उंचीचा निकष आता दहा फूटावर आणला आहे. महापालिका आता १५ हजार १६० झाडे लागवडीसाठी नव्याने प्रक्रिया नवीन निकषानुसार राबविणार आहे.