आगींच्या घटनांवरून अग्निशमन दलावर नगरसेवकांचे टीकास्त्र

तिबेटीयन बाजारातील स्फोटामागे सिलिंडरमधील गॅस गळती हे कारण असल्याचे स्पष्ट झाले. पालिकेच्या बाजारातील एका दुकानात सिलिंडरचा साठा करीत अग्निसुरक्षेशी संबंधित दक्षता बाळगली गेली नाही. गणेश मूर्ती व फटाके विक्रेत्यांची विविध निकष दाखवत छळवणूक करणाऱ्या अग्निशमन दलाने पालिका बाजारात सुरक्षा नियमांचे पालन होते की नाही, याची खातरजमा करण्याकडे दुर्लक्ष केल्याची परिणती या स्फोटात झाल्याचा आक्षेप स्थायी समितीच्या बैठकीत घेतला गेला. पांडवनगरी भागात अलिकडेच लागलेल्या आगीची झळ निवासी भागातील नागरिकांना बसली. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी विलंबाने पोहोचले. त्यानंतरही आग विझविण्याची कारवाई तातडीने केली गेली नाही. तिबेटीयन बाजार आणि वडाळा भागातील या घटनांच्या पाश्र्वभूमीवर, नगरसेवकांनी अग्निशमन दलाच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले.

गेल्या शनिवारी पहाटे तिबेटीयन बाजारातील एका दुकानात सिलिंडरचा स्फोट होऊन आठ ते नऊ दुकानांचे मोठे नुकसान झाले. त्यात तीन कामगार जखमी झाले. खाद्य पदार्थ विक्रेत्याने दुकानात ठेवलेल्या एका सिलिंडरमधून गळती होऊन ही दुर्घटना घडल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत तिबेटीयन बाजारातील स्फोट आणि वडाळा परिसरात आग विझविताना अधिकाऱ्यांनी दाखविलेला निष्काळजीपणा यावरून सदस्यांनी या विभागाचे प्रमुख अनील महाजन यांना धारेवर धरले.

शहरातील इमारतींमध्ये अग्निसुरक्षेशी संबंधित तजवीज असल्याची पडताळणीची जबाबदारी अग्निशमन दलावर आहे. या अनुषंगाने बांधकाम व्यावसायिकांना ना हरकत दाखला देण्यासाठी धडपडणारे या विभागाचे अधिकारी पालिकेच्या बाजारात या निकषांचे पालन होते की नाही, याकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भाजपचे जगदीश पाटील यांनी केला. अग्निशमन दल गणेशोत्सव व दिवाळीत विक्रेत्यांना निकषांचा अडसर दाखवितात. अग्निशमन व अतिक्रमण विभाग टोळधाडीप्रमाणे काम करतात. तिबेटीयन बाजारातील घटनेमुळे या विभागाला व प्रमुखांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अग्नि सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन होत असताना त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आक्षेपही पाटील यांनी नोंदविला.

पांडवनगरी भागात अलीकडेच आगीची घटना घडली. तिची झळ मागील भागातील रो हाऊसला बसली. अग्निशमन दलास माहिती कळवूनही ते विलंबाने दाखल झाले. आधी जो बंब दाखल झाला, त्याने आग विझविण्यासाठी कार्यवाहीला नकार दिला. वरिष्ठांच्या आदेशाशिवाय कार्यवाही करता येणार नसल्याची भूमिका घेतली. दरम्यानच्या काळात आगीची तीव्रता वाढली. निवासी भागातील नागरिकांना घर सोडून बाहेर पडावे लागले अशी तक्रार शाम बडोदे यांनी केली.

आग विझविण्याची प्रात्यक्षिके सादर करणारा हा विभाग प्रत्यक्ष आग लागल्यावर ढिम्म राहिला. यामुळे झालेल्या वित्तीय हानीला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आग विझविल्यानंतर केल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या सरबत्तीवर आक्षेप नोंदविण्यात आला. आयुष्यभराची कमाई भस्मसात झाली असताना अग्निशमनचे अधिकारी वेगवेगळे त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडतात.

या संदर्भात अग्निशमन दलाचे महाजन यांनी माहिती दिली. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्यालयातून तातडीने बंब घटनास्थळी रवाना झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांकडून आगीची तीव्रता अधिक असल्याची माहिती मिळाली.

यामुळे मुख्यालय, पंचवटी व सातपूर विभागातून तीन बंब रवाना केले गेले. बंब वाहतूक कोंडीत अडकल्याने घटनास्थळी पोहोचलण्यास काहीसा विलंब झाल्याचे कारण पुढे करण्यात आले. स्थायी सभापतींनी उपरोक्त घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.