वाचक, लेखक, पत्रकार, ग्रंथालयीन प्रतिनिधी यांच्यात एकत्रित संवाद साधला जावा यासाठी येथील ज्योती स्टोअर्सतर्फे १ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ‘पुस्तक महोत्सव’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सव कालावधीत रविवार कारंजा येथील ज्योती स्टोअर्सच्या ग्रंथ दालनात दिवसभर पुस्तक महोत्सव व सायंकाळी सहा ते सात वेळात स्नेहमेळावा हा उपक्रम सुरू राहणार आहे.
महोत्सवात राजहंस, साकेत, डायमंड, सरश्री लिखित पुस्तके व नॅशनल बुक ट्रस्ट आदी प्रकाशनांच्या सहयोगाने वाचकांना ३० टक्के सवलतीच्या दरात पुस्तके खरेदी करता येणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार, लेखक मनोहर शहाणे, ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. डॉ. विलास औरंगाबादकर, अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर, ज्येष्ठ रंगभूषाकार नारायण देशपांडे आदींच्या उपस्थितीत होणार आहे. मेळाव्यात ज्येष्ठ पत्रकार नरहरी भागवत, जयप्रकाश पवार, चंदुलाल शहा, शैलेंद्र तनपुरे, धनंजय वाखारे, अभिजित कुलकर्णी, वैशाली बालाजीवाले, दीप्ती राऊत आदी सहभागी होणार आहेत. महोत्सवाची सांगता मराठी राजभाषादिनी म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ लेखक, संपादक दत्ता सराफ, अपर्णा वेलणकर, सावानाचे माजी अध्यक्ष श्री. शं. सराफ, मविप्र शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. महोत्सव कालावधीत ग्रंथदालनात सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीत रविवार सोडून प्रदर्शन सुरू राहील. महोत्सवाचा साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक, ग्रंथप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक वसंत खैरनार यांनी केले आहे.