News Flash

करोनामुळे शेतकरी-ग्राहक दोघांनाही फटका

करोनामुळे बाजार समितीच्या आवारातील किरकोळ विक्री बंद करण्यात आली.

संग्रहित छायाचित्र

वाशी बाजार समितीत भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांच्या संख्येवर निर्बंध आल्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक व्यापारी माल खरेदीला उत्सुक नाही. स्थानिक पातळीवर विक्रीस मर्यादा आल्यामुळे घाऊक बाजारात भाजीपाल्याचे भाव घसरले आहेत. पण, किरकोळ बाजारात ग्राहकांना त्या महागात खरेदी कराव्या लागतात.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मुंबईसह गुजरात आणि इतर भागांत मोठय़ा प्रमाणात भाजीपाला पाठविला जातो. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना आंतरजिल्हा वाहतुकीत प्रारंभी अडचणी उद्भवल्या होत्या. त्या दूर झाल्यानंतर नाशिकहून मुंबईला भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वाहनांची संख्या विस्तारणे अपेक्षित होते. ती विस्तारली. याच सुमारास वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनांच्या संख्येवर निर्बंध घातले. यामुळे भाजीपाला पाठविणाऱ्या काही स्थानिक व्यापाऱ्यांना एकदा नुकसान सहन करावे लागले. सध्या साधारणपणे दिवसभरात मुंबईला ५०, गुजरात १३ आणि दिल्लीला दोन वाहने पाठविली जातात. कांदा घेऊन मालाड, भिवंडी आणि गुजरातमध्ये वाहने जातात. टाळेबंदीत भाजीपाला विक्री होईल की नाही, याबद्दल साशंकता असल्याने अनेक व्यापारी लिलावात सहभागी होत नसल्याचे बाजार समितीचे म्हणणे आहे. व्यापारी कमी असल्याने स्पर्धा होत नाही. कृषिमालास कमी भाव मिळण्याचे ते कारण आहे. करोनामुळे बाजार समितीच्या आवारातील किरकोळ विक्री बंद करण्यात आली.

भाजीपाला खरेदीसाठी शहरवासीयांची गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेने भाजीपाला विक्रीसाठी शहरात वेगवेगळ्या भागात ठिकाणे निश्चित केली आहेत. तिथे मुख्यत्वे विक्रेते असतात. घाऊक बाजारात अल्प दरात खरेदी केला जाणारा भाजीपाला त्यांच्याकडून किरकोळ बाजारात चढय़ा दराने विकला जात आहे.

घाऊक-किरकोळ बाजारातील तफावत

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अर्थात घाऊक बाजारात टोमॅटोला (प्रति क्विंटल) ५००, वांगी १५००, फ्लॉवर ५७१, कोबी ४००, ढोबळी मिरची ८७५, भोपळा ६६५, कारले १६६५, दोडका २०८०, काकडी १७००, बटाटा १९०० असे दर मिळाले. टाळेबंदीत विक्रीवर मर्यादा आल्याने आठ दिवसांत भाजीपाल्याचे दर घसरलेले आहेत. शहरातील किरकोळ बाजारात कोणतीही भाजी ५० ते ६० रुपयांपेक्षा कमी दराने मिळत नाही. घाऊक बाजारात टोमॅटोला किलोला पाच रुपये भाव आहे. किरकोळ बाजारात तो २५ ते ३० रुपयांनी विकला जातो. वांगी ६० रुपये, ढोबळी मिरची, कारले, दोडके अशा फळभाज्या ६० ते ८० रुपयांच्या दरम्यान आहेत. ज्या फळभाज्या किलोला सात ते २० रुपये दराने विकल्या जातात. त्यांची किंमत किरकोळ बाजारात तिप्पट, चौपट आहे.

जळगावमध्ये पाच व्यापाऱ्यांचा परवाना निलंबित

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत किरकोळ स्वरूपात भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या पाच घाऊक व्यापाऱ्यांचा परवाना १४ एप्रिलपर्यंत निलंबित करण्यात आला आहे. किरकोळ विक्रीमुळे बाजार समितीत ग्राहकांची मोठी गर्दी होते. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समितीत किरकोळ विक्रीला प्रतिबंध करण्यात आला होता. असे असताना संबंधितांनी सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी बाजार समितीस भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार बाजार समितीत हाजी रफीक ईसा बागवान, जोशी ब्रदर्स – सदाशिव वेडू जोशी, हबीब खाँ. समशेर खाँ., नाना पाटील अँड कंपनी – चंद्रकांत पाटील, गजानन ट्रेडिंग कंपनी – आसाराम बावस्कर या अडत्यांची (व्यापारी) परवाने निलंबित करण्यात आले आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 12:27 am

Web Title: both farmers and consumers are hit by a corona abn 97
Next Stories
1 उत्तर महाराष्ट्रात पुरेशा ‘व्हेंटिलेटर’साठी खासगी रुग्णालयांशी करार
2 स्थायी सभापती निवडणुकीचा निकाल जाहीर करा
3 नाशिकमध्ये तबलीग जमात परिषदेहून परतलेले ३२ जण सापडले
Just Now!
X