जलजागृती सोहळ्यात राजेश पवार यांचा इशारा

कधीकाळी नद्यांमध्येदेखील शुद्ध पाणी मिळत असे. नंतर विहिरींमध्ये आणि आता केवळ नळाद्वारे शुद्ध पाणी मिळते. परिस्थिती अशीच बदलत राहिली तर केवळ पॅकबंद बाटलीतील पाणी पिण्यास योग्य राहील. यामुळे पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असा सूचक इशारा महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (मेरी) महासंचालक राजेश पवार यांनी दिला. जागतिक जलदिनानिमित्त जलसंपदा विभागाच्यावतीने आयोजित जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी पाणी बचतीबाबत उपस्थितांना प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच जिल्ह्यतील ११ नद्यांतील जलाचे पूजन करण्यात आले. पवार यांच्यासह इतरांनी पाण्याचे महत्व मांडले. इतर राज्यांच्या तुलनेत नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात सर्वात जास्त सिंचन प्रकल्प निर्माण झाले आहेत. त्याचा फायदा सर्व क्षेत्रांच्या विकासालादेखील होत असल्याचे पवार यांनी नमूद केले. राज्यात ८५ हजार लहान-मोठे धरण आहेत. यामध्ये कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, लघु-मध्यम सिंचन प्रकल्प, मोठय़ा धरणांचा समावेश आहे. राज्यातील उद्योग, शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होत असून शहरांसाठी देखील नागरी वस्तीला पाणी पुरविण्याचे काम हे प्रकल्प करीत आहेत.

भारतातील प्रति माणसी पाणी उपलब्धता ही २२०० घन मीटर आहे. सद्यस्थितीत हे पुरेसे आहे, पण शेतीसाठी नवीन सिंचन पद्धतीचा वापर करून ‘मोअर क्रॉप पर ड्रॉप’चा अवलंब करावा लागेल. पाण्याचा पुनर्वापर ही काळाची गरज असून सांडपाण्याचा उपयोग भाजीपाला उत्पादनासाठी करता येईल. अशा उपायांमधून उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे लागेल. यासाठी इस्त्रायलचे उदाहरण प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी उद्योगापासून कृषिपर्यत सर्व क्षेत्रांची पाण्याची गरज भागविण्याचे महत्त्वाचे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून होत असल्याचे सांगितले.

गावोगावी जनजागृती

जलजागृती सप्ताहांतर्गत ८५० गावांमध्ये मेळावे, कार्यक्रमांद्वारे जनजागृती केली जाणार असल्याचे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे यांनी सांगितले. जलसंपदा विभागातर्फे २२ मार्चपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत जल पूजन, शालेय, खुल्या गटात चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा, पाणी या विषयावर व्याख्याने, छायाचित्र प्रदर्शन, कवी संमेलन आदी कार्यक्रम होणार आहेत. या सप्ताहाचा समारोप २२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता परशुराम साईखेडकर नाटय़गृहात होणार आहे.