25 April 2019

News Flash

खंडणीसाठी अपहरण झालेल्या मुलाची सुटका

घरकुल योजनेतील इमारत क्रमांक नऊमधील आठ क्रमांकाच्या खोलीत संशयित साहिलकुमार अरुणकुमार झा हाती लागला.

प्रतिनिधिक छायाचित्र

एकास अटक, ३ जण फरार

नाशिक : दहा लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाची चुंचाळे शिवारातील एका घरातून सुखरूपपणे सुटका करीत संशयितास अटक करण्यात पोलिसांना यश आले. गुन्हे शाखा युनिट एकने ही कामगिरी केली. संशयिताकडून गुन्ह्य़ात वापरलेली मोटारसायकल आणि भ्रमणध्वनी सिमकार्ड जप्त करण्यात आले. पोलिसांनी युद्धपातळीवर शोध मोहीम राबविल्याने अपहृत मुलाची सुखरूप सुटका झाली. या प्रकरणातील तीन संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

मंगळवारी सकाळी अपहरणाचा हा प्रकार घडला होता. या संदर्भात कैलास जाधव यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सकाळी जाधव यांचा मुलगा महाविद्यालयात जातो म्हणून घराबाहेर पडला. महाविद्यालय सुटल्यानंतरही तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी मित्र, नातेवाईक आदींकडे शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यामुळे कुणीतरी मुलास पळवून नेल्याची तक्रार त्यांनी दिली होती. दरम्यानच्या काळात अपहृत मुलाच्या वडिलांना एका भ्रमणध्वनी क्रमांकावरून संशयितांनी तुमचा मुलगा आमच्या ताब्यात असल्याचे सांगितले. दहा लाख रुपये दिल्यावरच त्याची सुटका होईल, अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सरकारवाडा पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकला तपास करण्याचे निर्देश दिले होते. पोलिसांनी संशयितांची मागणी लक्षात घेऊन तक्रारदाराच्या हस्ते पैसे देण्यासाठी सापळा रचला. परंतु संशयितांनी वेळोवेळी ठिकाणे बदलल्याने तो यशस्वी झाला नाही.

गुन्ह्य़ाचा समांतर तपास करताना संशयित अंबडच्या चुंचाळे शिवारातील असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ आणि सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी यांना मिळाली. उभयतांनी पोलीस पथकाला घेऊन चुंचाळे शिवार पिंजून काढला. या वेळी चुंचाळे घरकुल योजनेतील इमारत क्रमांक नऊमधील आठ क्रमांकाच्या खोलीत संशयित साहिलकुमार अरुणकुमार झा हाती लागला. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने इतर साथीदारांच्या मदतीने अल्पवयीन मुलाचे खंडणीसाठी अपहरण केल्याची कबुली दिली. अपहृत मुलास चुंचाळे शिवारातील घरकुल योजनेतील एका खोलीत डांबून ठेवल्याचे सांगितले. ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता संशयिताला घेऊन उपरोक्त ठिकाण गाठले आणि कुलूपबंद खोलीत डांबलेल्या मुलाची सुटका केली. महाविद्यालयात सोडून देतो असे सांगून करण नामक व्यक्तीने तीन साथीदारांसह लाल रंगाच्या सीबीझेड मोटारसायकलवर बसवून चुंचाळे शिवारातील खोलीत कोंडून ठेवल्याचे या मुलाने सांगितले. आरडाओरड केल्यास मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या साहिलकुमार झा या संशयितासह गुन्ह्य़ात वापरलेली मोटारसायकल, भ्रमणध्वनी सिमकार्ड असा ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल पुढील तपासासाठी सरकारवाडा पोलिसांकडे देण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले आणि सहकाऱ्यांनी तपास केला.

First Published on February 9, 2019 2:18 am

Web Title: boy kidnapped for ransom rescued