News Flash

प्रवाशांनी मुंबईला जाणे टाळले

मंगळवारच्या पावसात मुंबईची दाणादाण उडाल्याचे पाहून अनेकांनी मुंबईला जाणे टाळले वा पुढे ढकलले आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसगाडय़ा कल्याणपर्यंत सोडण्याची तयारी करण्यात आली.

रेल्वे मार्ग ठप्प असल्याने प्रवाशांसमोर रस्ते मार्गाने मुंबई गाठण्याचा एकमेव पर्याय होता. आदल्या दिवशीचा प्रतिसाद लक्षात घेऊन एसटी महामंडळाने कल्याणपर्यंत जादा बसगाडय़ा सोडण्याची जय्यत तयारी केली. तथापि, मुंबईला जाणाऱ्या नियमित बसगाडय़ा पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने अधिकच्या बस सोडण्याची वेळ आली नाही. मंगळवारच्या पावसात मुंबईची दाणादाण उडाल्याचे पाहून अनेकांनी मुंबईला जाणे टाळले वा पुढे ढकलले आहे.

डबे घसरल्याने नाशिक-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यानंतर नाशिकरोड, घोटी, इगतपुरी व मनमाड रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना पुढील प्रवासासाठी रस्ते मार्गाचा आधार घ्यावा लागला. या स्थितीत खासगी प्रवासी वाहतुकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करत प्रवाशांची पिळवणूक केली. एसटी महामंडळाने आदल्या दिवशी कल्याणपर्यंत १०० जादा बसेस सोडून प्रवाशांना सेवा दिली. रेल्वेच्या मागणीनुसार इगतपुरी स्थानकात १५ बसेस उपलब्ध करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी रेल्वे वाहतूक बंद राहिल्याने प्रवासी एसटी बसने मुंबई गाठतील, असा अंदाज होता. परंतु, तो फोल ठरला. मुंबईतील पावसाचे भयावह चित्र पाहून अनेकांनी तिकडे जाणे टाळले अथवा लांबणीवर टाकल्याचे अधोरेखित झाले.

प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसगाडय़ा कल्याणपर्यंत सोडण्याची तयारी करण्यात आली. गर्दी लक्षात घेऊन एक बस भरल्यानंतर लगेच दुसरी बस पाठविण्याचे नियोजन होते. तथापि, दुपापर्यंत जादा बस सोडण्याची वेळ आली नसल्याची माहिती वाहतूक निरीक्षक व्ही. एस. गणोरे यांनी दिली. नाशिकहून मुंबई, दादर, ठाणे, कल्याण, व पनवेल आदी भागात दररोज ७३ बसेस पाठविण्यात येतात. बुधवारी या बसेस पूर्ण क्षमतेने भरल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. जादा बसगाडय़ांची व्यवस्था कल्याणपर्यंत करण्यात आली. बसेस मुंबईत गेल्या की वाहतूक कोंडीत अडकतात.

प्रवाशांना कल्याणहून रेल्वेने जलदपणे मुंबई गाठायची असते. परंतु, दुसऱ्या दिवशी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय घटल्याचे निदर्शनास आले. बसप्रमाणे खासगी वाहनाने मुंबईला जाणाऱ्यांची स्थिती होती.

मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या वाहनांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे टोल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. मुंबईतील पावसाचा धसका नाशिककरांनी घेतल्याचे या घडामोडींनी अधोरेखित केली.

मनमाडसाठी जादा १२ बसेस

नाशिकहून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली असताना दुसरीकडे रेल्वेच्या मनमाड या महत्त्वाच्या जंक्शनवर अडकलेल्या प्रवाशांसाठी बुधवारी १२ जादा बसगाडय़ा उपलब्ध करण्यात आल्या. मनमाड-नाशिक या मार्गावर या जादा बस धावल्या. रेल्वे मार्गावरील अन्य कोणत्याही भागातून अधिकच्या बसेसची मागणी झाली नसल्याचे महामंडळाने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2017 3:01 am

Web Title: bus passengers from nashik avoid to travel mumbai due railway route jam
Next Stories
1 चार दिवस ध्वनिक्षेपकाचे!
2 ‘समृद्धी’च्या मार्गात इंधन वाहिनीचा प्रश्न
3 वंचितांचा आधारवड आधाराच्या प्रतीक्षेत!
Just Now!
X