शहरात ११० मार्ग निश्चित; दर १० मिनिटांनंतर बस

शहरात सक्षम बस सेवा देण्यासाठी महापालिका  सेवा सज्ज झाली आहे. शहरात ११० मार्ग निश्चित करण्यात आले असून  प्रत्येक मार्गावर दर १० मिनिटांनी बस उपलब्ध राहील असे नियोजन करण्यात आले आहे. सेवेसाठी तीन आगार, १२ स्थानक आणि इलेक्ट्रिक बससाठी ५० ‘चार्जिग पॉइंट’ या कायमस्वरुपी व्यवस्थेसाठी ६५ ते ७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत बस सेवेचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. राज्यात इतर महापालिकांमार्फत बस सेवा चालविली जाते. अनेक महापालिकांची सेवा तोटय़ात आहे. इतर महापालिकांची बस सेवा आणि नाशिकमधील प्रस्तावित बस सेवा यामध्ये फरक राहील अशी माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. नाशिकमध्ये बस खरेदी, त्यांची देखभाल, दुरुस्ती, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ याचा कोणताही भार महापालिकेवर येणार नसल्याची दक्षता घेण्यात येईल.  बस सेवा सुरू करताना साधारणत: ३०० ते ३५० गाडय़ा खासगी वाहतूकदारांकडून घेण्यात येतील. त्यात निम्म्या बस नियमित स्वरुपाच्या तर निम्म्या मिनी बस असतील. रुंदी कमी असणाऱ्या रस्त्यांवर सेवा देण्यासाठी मिनी बसचा वापर केला जाईल. इलेक्ट्रिक आणि डिझेल बस असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यात इलेक्ट्रिक बसचा प्राधान्याने विचार केला जात आहे. इलेक्ट्रिक बसचा देखभाल खर्च कमी असतो. त्या दिसायला आकर्षक असतात. इलेक्ट्रिक बस घेतल्यास महापालिकेला किमान ५० ठिकाणी बॅटरी जार्चिग करण्यासाठी व्यवस्था करावी लागणार आहे. त्यासाठी अंदाजे ३० कोटींच्या आसपास खर्च अपेक्षित असल्याचे मुंढे यांनी सांगितले.

चालक आणि बसच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च संबंधित वाहतूकदारावर राहणार आहे. प्रति किलोमीटरच्या दराने महापालिका वाहतूकदाराला पैसे देईल. तिकीटातून मिळणारे उत्पन्न महापालिकेचे असेल. या सेवेत पालिका वाहक उपलब्ध करेल अथवा त्रयस्थ खासगी संस्थेमार्फत आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करणार आहे. गर्दीच्या वेळा लक्षात घेऊन वाहक-चालकाची दैनंदिन सेवा दोन टप्प्यात विभागण्याचा विचार आहे. बस सेवेसाठी ११० मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक मार्गावर बसची १० मिनिटांनी वारंवारिता राहील याची  दक्षता घेतली जाईल.

बस उपलब्धतेची खात्री पटल्यास नागरिकांकडून इतर वाहनांचा वापर कमी होईल. पर्यायी खासगी वाहतुकीचा आधार घेणे कमी होईल. शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून या सेवेची मांडणी करण्यात आली आहे. गरज लक्षात घेऊन मार्ग बदलला जाईल. सकाळी रेल्वे, एसटी स्थानक, शाळा-महाविद्यालयांकडे जाणाऱ्यांचा ओढा असतो. त्या वेळी त्या त्या मार्गावर फेऱ्या वाढविण्याचे नियोजन आहे.

खर्च-उत्पन्नात समतोल साधण्याची गरज

बस सेवा चालविण्यासाठी येणारा खर्च आणि तिकीटातून मिळणारे उत्पन्न यांच्यात समतोल साधला गेल्यास ही सेवा तोटय़ात जाणार नाही. बस खरेदी, मनुष्यबळाची उपलब्धता, बसची देखभाल-दुरुस्ती अशी कोणतीही जबाबदारी महापालिकेने स्वत:च्या शिरावर घेतलेली नाही. बस सेवा कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेला एकदा भांडवली गुंतवणूक करावी लागेल. ही सेवा चालविण्यासाठी येणारा खर्च आणि तिकीटातून मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बसविणे गरजेचे राहील. त्यामध्ये जी तफावत राहील, ती रक्कम तोटा म्हणून गणली जाईल. पर्यावरणस्नेही बसच्या माध्यमातून महापालिकेला ‘कार्बन क्रेडिट’ प्राप्त करता येईल. शहरवासीयांना सुरक्षित आणि सक्षम सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था पुरविण्यासाठी महापालिका काही भार निश्चित पेलू शकेल. या माध्यमातून वाहतूक कोंडी सारखे प्रश्न काही अंशी कमी करता येतील.

कायमस्वरुपी गुंतवणूक

सहा ते सात एकरच्या जागेत प्रत्येकी एक बस आगार, याप्रमाणे तीन आगार उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी प्रत्येकी सहा कोटी म्हणजे एकूण १८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. बस संचलनासाठी एक ते दीड एकर जागेत प्रत्येकी एक यानुसार १२ स्थानके उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अंदाजे प्रत्येकी दीड कोटी म्हणजे एकूण १८ कोटी रुपये खर्च करावा लागेल. इलेक्ट्रिक बस घेतल्यास काही अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. त्यात बसची बॅटरी चार्ज करण्यासाठी ५० ठिकाणी केंद्र उभारावे लागतील. त्यामुळे साधारणत: ३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

‘क्रिसिल’च्या अहवालात त्रुटी

बस वाहतूक महापालिकेने चालविण्याबाबत व्यवहार्यता तपासणीसाठी नेमलेल्या क्रिसिल सल्लागार संस्थेच्या अहवालात अनेक त्रुटी आहेत.  यामुळे महापालिकेने तो स्वीकारलेला नाही. ज्या संस्थेच्या अहवालाच्या आधारे बस सेवा सुरू केली जात असल्याचे सांगितले जात आहे, त्या संस्थेच्या अहवालात अनेक त्रुटी असल्याकडे लक्ष वेधले जात आहे.

११० मार्गावर बस थांबे

शहरात ११० मार्गावर बस थांबे उभारण्यात येणार आहेत. थांब्यांवरील जाहिरातीचे २० वर्षांसाठी अधिकार देऊन ते खासगीकरणातून उभारले जातील. महापालिकेला त्यावर खर्च करावा लागणार नाही. इलेक्ट्रॉनिक पडदे असणारे हे थांबे असतील. त्यावर बसचे वेळापत्रक आणि तत्सम सुविधा प्रवाशांना मिळण्याची व्यवस्था केली जाईल. पुढील काळात हे थांबे महापालिकेच्या बस सेवेच्या उत्पन्नातील महत्त्वाचा स्रोत ठरतील, अशी अपेक्षा आहे.

नियमांचे उल्लंघन झाल्यास वाहतूकदारांना दंड

तिकीट वितरण प्रणाली इलेक्ट्रॉनिक यंत्रावर आधारीत राहणार आहे. शहर बस सेवेचे वेळापत्रक, विविध मार्ग, बस येण्या-जाण्याची वेळ, सर्व माहिती नागरिकांना भ्रमणध्वनी अ‍ॅपवर उपलब्ध केली जाईल. याच स्वरुपाची कार्यप्रणाली बस संचलनात वापरली जाणार आहे. प्रत्येक बसवर बारकाईने नजर ठेवली जाईल. प्रत्येक बसने किती फेऱ्या मारल्या, इथपासून ते कोणत्या थांब्यावर बस थांबली नाही इथपर्यंतची इत्यंभूत माहिती स्वयंचलीत पध्दतीने प्राप्त होईल. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित वाहतूकदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.