News Flash

बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा

बससेवा बंद राहिल्यामुळे महामंडळाला सुमारे दीड कोटीच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.

 

दुचाकीवरून घोषणा देत फिरणाऱ्या टोळक्यांमुळे घबराट

तळेगावच्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात निर्माण झालेले तणावाचे वातावरण निवळण्याच्या दृष्टीकोनातून विजयादशमीच्या दिवशी ग्रामीण पोलिसांनी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले. विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने दोन दिवस बंद ठेवलेली शहर बस आणि बाहेरगावी जाणारी बस सेवा सुरू केली. त्यामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांबरोबर सणोत्सवानिमित्त प्रवास करणाऱ्यांनाही दिलासा मिळाला. वातावरण शांत होत असतानाच शहरातील मुख्य बाजारपेठ व इतर भागात युवकांचे जत्थे दुचाकीला विशिष्ठ झेंडे लावून महापुरूषांच्या नावाने घोषणाबाजी करत भ्रमंती करत होते. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरून तणावात भर पडली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव येथे चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याच्या घटनेचे पडसाद रविवारी ठिकठिकाणी उमटले. संतप्त जमावाने मुंबई-आग्रा महामार्ग, नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर एसटी बसगाडय़ा, पोलीस व खासगी वाहने यांच्यावर दगडफेक करत जाळपोळ केली. या घडामोडीमुळे उपरोक्त मार्गावरील बंद ठेवण्यात आलेली वाहतूक रविवारी रात्रीपासून सुरू करण्यात आली. सोमवारपासून भ्रमणध्वनीवरील इंटरनेट आणि एकत्रित स्वरुपात लघुसंदेश पाठविण्याची सेवा बंद करण्याचा सकारात्मक परिणाम झाला. ओसंडून वाहणाऱ्या अफवांचे पीक रोखण्यात यंत्रणेला यश आले.

शहर व ग्रामीण भागात शांतता प्रस्थापित होण्यासाठी यंत्रणा प्रयत्नरत असताना नाशिकरोड भागात दुचाकींवर फिरणाऱ्या टोळक्याने दहशतीचे वातावरण निर्माण केले. या ठिकाणी एका युवकासह त्याच्या आईलाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रात्री व सकाळी काही जणांना ताब्यात घेण्यात आले. शहरात इतरही काही भागात युवकांचे टोळके दुचाकीवरून घोषणाबाजी करत भ्रमंती करताना दृष्टीपथास पडत होते. त्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी काही मार्गावर लोखंडी जाळ्या उभारल्या. तरी देखील ऐन सणोत्सवात मध्यवर्ती भागातील मार्गावरून असे जत्थे फिरत होते. यामुळे खरेदीत मग्न असणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. संवेदनशील गावांमध्ये दसरा सणावर तणावाचे सावट होते. यामुळे उपरोक्त भागात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याची खबरदारी घेण्यात आली. तणाव निवळत असताना अशा प्रकारे दुचाकीवरून टोळके घोषणा देत फिरतातच कसे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.

जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे लक्षात घेऊन एसटी महामंडळाने दोन दिवस बंद ठेवलेली प्रवासी वाहतूक नियमित स्वरुपात सुरू केली. जनक्षोभाचा सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला. महामंडळाच्या सात बसगाडय़ांची जाळपोळ तर १५ हून अधिक बसची तोडफोड झाली होती. या नुकसानीचा आकडा दीड कोटी रुपयांपर्यंत गेल्याचे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितले. रविवारी दुपारपासून ते मंगळवारी सकाळपर्यंत शहर व बाहेरगावची बससेवा बंद राहिल्यामुळे महामंडळाला सुमारे दीड कोटीच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.

गावोगावी बैठकांचे सत्र

विजयादशमीच्या दिवशी ग्रामीण भागात शांततेचे वातावरण आहे. शांतता व सौहार्दतेचे वातावरण प्रस्थापित होण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी गावोगावी बैठका घेऊन दोन्ही समाजातील तणाव दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गावोगावी बैठका घेऊन तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संवेदनशील गावांमध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अंकुश शिंदे (पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण)

शहरात शांतता

विजयादशमीच्या सणामुळे युवकांच्या गटांची होणारी भ्रमंती ही नेहमीची बाब आहे. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रमुख चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात आहे. शहरातील सर्व भागात शांततेचे वातावरण आहे. सोमवारी नाशिकरोड येथे घडलेल्या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेण्यात आले.

रवींद्र सिंघल (पोलीस आयुक्त, नाशिक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 1:31 am

Web Title: bus services started in nashik
Next Stories
1 ‘कोती’ ची गोव्यातील चित्रपट महोत्सवासाठी निवड
2 तणाव निवळण्यासाठी..
3 ‘तळेगाव’च्या निमित्ताने राजकीय हिशेब चुकते करण्यावर भर
Just Now!
X