भाजप आमदारांच्या मागणीनंतर कारवाई

केंब्रीज शाळेकडून शिक्षण हक्क कायद्याची सुरू असणारी पायमल्ली, शाळेकडून पालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता देण्यात आलेले दाखले लक्षात घेऊन शिक्षण मंडळाने संबंधित शाळा व्यवस्थापना विरोधात फौजदारी कारवाई करावी, या मागणीसाठी पालकांनी शुक्रवारी पालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे पालिका मुख्यालयात गोंधळ उडाला. शिक्षण मंडळ संबंधित शाळेविरोधात कारवाई करीत नसल्याचा आरोप पालकांनी केला तर पालक घुमजाव करीत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात लक्ष घातले आहे. शाळेवर फौजदारी कारवाई करावी यासाठी आ. प्रा. देवयानी फरांदे व आ. सीमा हिरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळेविरुध्द कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले आहे. या संदर्भात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंब्रीज शाळेत सध्या शुल्क वाढीचा मुद्दा चर्चेत असून पालक व शाळा प्रशासन या प्रश्नावर आमनेसामने आले आहेत. मागील वर्षी शाळेने अचानक शुल्कवाढ केली. त्या विरोधात पालकांनी एकत्र येत शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचच्या नेतृत्वाखाली लढा सुरू केला. हा प्रश्न नऊ महिन्यांपासून विभागीय शिक्षण शुल्क समितीकडे प्रलंबित असल्याने पालकांनी अद्याप मागील वर्षांचे शुल्क भरलेले नाही. दुसरीकडे, पालकांच्या या भूमिकेविरोधात शाळा न्यायालयात गेली. हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने संबंधित पाल्यांचा शुल्काचा विषय प्रलंबित आहे. दरम्यानच्या काळात शाळेने शुल्क भरले नाही असे कारण दाखवत ५० मुलांचे दाखले घरी पाठविले. संबंधित विद्यार्थ्यांना शाळेने प्रवेश नाकारला. प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नेमत पालक व विद्यार्थ्यांना उन्हात चार तास बसवून ठेवले. यामुळे वैतागलेल्या पालकांनी शाळा व्यवस्थापनावर शिक्षण हक्क कायद्याचा भंग, पालकांना मानसिक त्रास या कारणास्तव फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करत पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या दालनात ठिय्या दिला. आयुक्तांनी प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांच्याशी चर्चा करत पालकांना अपेक्षित स्पष्ट पत्र द्या असे सूचित केले. त्यानुसार पालकांना उपासनी यांनी पत्र दिले. मात्र त्यात शाळेवर फौजदारी कारवाईचा उल्लेख टाळण्यात आला. यामुळे पालकांच्या संतापात भर पडली. दरम्यान, आ. सीमा हिरे व आ. देवयानी फरांदे यांनी शाळेत धडक देत पालकांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांचे दाखले या पध्दतीने घरी पाठविणे, त्यांना शाळेतून काढून टाकणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, शाळा आधीचे शुल्क भरण्यावर ठाम राहिल्याने आमदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन मुजोर शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली. आयुक्तांनी शाळेवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे संबंधितांनी सांगितले. त्या अनुषंगाने शाळेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आ. फरांदे यांनी सांगितले. दरम्यान, आदल्या दिवशी हा तिढा सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न प्रशासनाधिकाऱ्यांनी केला होता. संबंधित विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नसताना त्यांना शाळेत का घ्यावे, अशी नोटीस शाळेने आपणाला पाठविल्याचे उपासनी यांनी म्हटले आहे.