News Flash

पक्षनिष्ठेपेक्षा ‘उमेदवारी’ हाच आमचा पक्ष

इतर पक्ष-प्रवेशासाठी मोर्चेबांधणी त्यांनी सुरू केली आहे.

 

इच्छुकांची इतर पक्ष-प्रवेशातून उमेदवारी मिळविण्याची स्पर्धा; भाजप, शिवसेनेकडे उमेदवारांची संख्या अधिक

निवडणुका नसताना प्रत्येक राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षनिष्ठेच्या गप्पा मारत असतात. परंतु निवडणूक आली की उमेदवारी मिळावी यासाठी पक्षनिष्ठा कशी खुंटीला टांगली जाते याचे दर्शन वारंवार प्रत्येक निवडणुकीत होत असते. सध्याची महापालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूकही त्यास अपवाद ठरलेली नाही. इच्छुकांच्या भाऊगर्दीत उमेदवारीसाठी असलेली स्पर्धा लक्षात घेता ‘उमेदवारी’ हाच इच्छुकांनी आपला खरा पक्ष ठरवला आहे. त्यासाठी इतर पक्ष-प्रवेशासाठी मोर्चेबांधणी त्यांनी सुरू केली आहे.

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्य़ात भाजप आणि शिवसेना यांच्यात उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. महापालिकेच्या १२२ जागांसाठी प्रत्येक ठिकाणी या दोन्ही पक्षांकडे किमान १० जण तरी इच्छुक आहेत. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर इतर पक्षांमधून जे जे येतील त्या सर्वाना उमेदवारीचे आश्वासन देत सामावून घेण्यात आल्याने दोन्ही पक्षांकडे इच्छुकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. इतर पक्षांमधून आलेल्यांमुळे पक्षासाठी कित्येक वर्षांपासून कार्यरत निष्ठावंत धास्तावले असून बाहेरून आलेल्यांमुळे आपल्या उमेदवारीवर गंडांतर येण्याच्या भीतीने या दोन्ही पक्षांमध्ये सध्या ‘आतले आणि बाहेरचे’ असा सुप्त संघर्ष सुरू झाला आहे.

पक्षांतर करणाऱ्या प्रत्येकाला उमेदवारी हवी आहे. पक्षनिष्ठा गेली वाऱ्यावर असेच एकंदरीत त्यांचे वर्तन असून पक्षांतर करून १० दिवसही होत नाहीत तोच उमेदवारी मिळणार नसेल तर पुन्हा दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत अनेक जण आहेत. केवळ उमेदवारी हाच त्यांचा पक्ष झाला आहे. राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारीही आपल्या पक्षातील निष्ठावंतांवर विश्वास टाकण्यापेक्षा ऐनवेळी पक्षात येणाऱ्यांना विश्वासू मानू लागल्याने आपण पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करून काय मिळविले, अशी अस्वस्थता निष्ठावंतांमध्ये निर्माण होत आहे.

मनसेचे सुगीचे दिवस असताना पक्ष प्रवेशासाठी रीघ लागली होती. पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे नेतृत्वच कसे सक्षम आहे, ते कसे आक्रमकपणे पक्षाला पुढे नेत आहेत, वगैरे चर्चा होत असे. कालांतराने पक्षाचे आकर्षण कमी झाल्यावर जी मंडळी राज ठाकरे यांचे गुणगान गाताना विरोधकांवर टीकास्त्र सोडत होती, तीच मंडळी मनसेतून बाहेर पडून इतर पक्षांमध्ये विसावू लागली. मनसेमध्ये राहून आपण निवडून येणे अवघड असल्याची भीती वाटल्याने एकेक नगरसेवक पक्षातून बाहेर पडू लागला.

केवळ सध्या चलती असलेल्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी हीच त्यांची अपेक्षा आहे. ज्या पक्षात आपण प्रवेश करीत आहोत, त्या पक्षाची विचारधारा, त्यांचे धोरण यास ही मंडळी काडीची किंमत देत नाहीत.

उमेदवारी न मिळाल्यास पुन्हा त्या पक्षाच्या नेत्यांवर टीका करण्यास ते तयारच असतात. उमेदवारी मिळाल्यास तो पक्ष सर्वगुण परिपूर्ण आणि उमेदवारी न मिळाल्यास त्या पक्षात उमेदवारी देताना कसे अर्थपूर्ण व्यवहार केले जातात, पक्षातील मंडळी कशी भ्रष्ट आहेत, याविषयी आरोप केले जातात. कोणा एकाची उमेदवारी जाहीर केल्यास नाराज झालेले मैदानात राहणारच आहेत. बंडखोरांची संख्या वाढल्यास आपला निश्चितपणे निवडून येणारा उमेदवारही अडचणीत येऊ शकतो, याचा धोका पदाधिकाऱ्यांना वाटत असल्याने येनकेनप्रकारेण बंडखोरी कमीतकमी होईल याकडे पदाधिकाऱ्यांना लक्ष द्यावे लागत आहे.

जागा एक इच्छुक अनेक

उमेदवारीसाठी काहीपण, अशीच मन:स्थिती सध्या सर्व इच्छुकांची आहे. जागा एक आणि इच्छुक अनेक अशी स्थिती असल्याने भाजप आणि शिवसेना आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यास चालढकल करीत असून दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांना बंडखोरीची धास्ती आहे. निवडणुकीच्या रणसंग्रामात बंडखोरांची कितीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्येकाचे बाहू फुरफुरत असल्याने ते निवडणुकीला एक तर अपक्ष म्हणून किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षाच्या तिकीटावर उभे राहतातच. पक्षनिष्ठा वगैरेचा विचार करण्यास त्यांना बिल्कूल वेळ नसतो. महापालिकेतील सत्ताधारी मनसे सध्या हाच अनुभव घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 1:13 am

Web Title: candidate issue in nashik
Next Stories
1 नाशिकची राष्ट्रवादीकडे सामूहिक जबाबदारी
2 मुख्यमंत्र्यांकडून असभ्य शब्दांचा वापर
3 अर्थसंकल्प स्वागतार्ह आणि निराशाजनकही!
Just Now!
X