News Flash

पोलीस भरतीत पास होण्यासाठी त्याने लावला केसांचा विग

आपली उंची १७५ सेंटीमीटरच्या दिसावी यासाठी किसनने डोक्यावर विग घातला होता.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. नाशिकमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरतीच्यावेळी असाच एक अचंबित करणारा प्रकार घडला. याठिकाणी भरतीसाठी आलेल्या किसन पाटील या तरूणाने उंचीमुळे नोकरी जाऊ नये म्हणून डोक्यावर केसांचा नकली विग लावला. आपली उंची १७५ सेंटीमीटरच्या दिसावी यासाठी किसनने डोक्यावर विग घातला होता. सुरूवातीला त्याची ही शक्कल यशस्वी ठरली असे वाटले. मात्र, नेमक्या त्याचवेळी एका चाणाक्ष हवालदारामुळे त्याचे बिंग फुटले आणि तो पकडला गेला.

 

गेल्या चार दिवसांपासून नाशिकमध्ये पोलीस भरतीसाठी मैदानी परीक्षा सुरू आहेत. यावेळी उंची मोजली जात असताना किसन पाटील केसांचा टोप घालून अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला. तपासणीवेळी त्याची उंचीही जास्त मोजली गेली. मात्र, एका कॉन्स्टेबलला त्याच्या केसांची ठेवण पाहून संशय आल्याने त्याने पुन्हा एकदा किसनची नीट तपासणी केली. यावेळी त्याने डोक्यावर घातलेला विग कॉन्स्टेबलच्या हातात आला. या घटनेनंतर किसन पाटीलला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये सध्या सुरू असलेल्या पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. शहर व ग्रामीण पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेस बुधवारी सुरुवात झाली होती. शहर पोलीस दलात शिपाई पदाच्या ७९ आणि बॅण्ड पथकातील १८ जागांसाठी १४ हजार २२० तर नाशिक ग्रामीण पोलीस दलात ७२ जागांसाठी ११ हजार २९० उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. पदांच्या तुलनेत प्राप्त झालेल्या अर्जाची प्रचंड संख्या बेरोजगारीचे प्रमाण दर्शवित आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठी आहे. शहर व ग्रामीण पोलीस या दोन्ही ठिकाणच्या भरती प्रक्रियेला पहाटेच धावण्याच्या चाचणीद्वारे सुरुवात झाली. ऑनलाइन अर्ज भरणाऱ्या एक हजार उमेदवारांना पहिल्या दिवशी मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले. या प्रक्रियेत कागदपत्रे तपासणी व पडताळीस फाटा देऊन उमेदवारांना थेट मैदानात उतरवण्यात आले. शहर पोलिसांनी धावण्याची चाचणी गंगापूर रस्त्यावरील शहीद अरुण चित्ते पुलापासून हॉटेल मिर्चीपर्यंत या मार्गावर तर ग्रामीण पोलिसांनी आडगाव मुख्यालयाच्या मैदानावर चाचणी घेण्यात आली. पुरूष उमेदवारांना १६०० मीटर तर महिला उमेदवारांसाठी ८०० मीटरचे अंतर निश्चित करण्यात आले. शहरातील उपरोक्त मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. मैदानी खेळांची चाचणी पोलीस कवायत मैदानावर पार पडली. त्या अंतर्गत प्रथम वजन, उंची यांचे मोजमाप झाल्यावर गोळा फेक, लांब उडी, पुलअप्सची चाचणी घेतली गेली. प्रत्येक क्रीडा प्रकारात विहित निकषानुसार कामगिरीनिहाय कसे गुण दिले जातील, याचीही माहिती आधीच जाहीर करण्यात आली आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरा यंत्रणेची नजर ठेवण्यात आली.

मैदानात चाचणीनंतर प्रत्येक उमेदवाराला त्याची कामगिरी निदर्शनास आणून दिली जात होती. म्हणजे उमेदवाराची लांब उडी किती अंतरापर्यंत गेली, गोळा किती अंतरावर फेकला गेला, याचे मोजमाप उमेदवाराला लगेच दर्शविले जात होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 12:29 pm

Web Title: candidate put hair wig on head to get eligible for police recruitment in maharashtra
Next Stories
1 आदिवासी विकास विभागाच्या पत्रिकेत भुजबळांचे नाव
2 अन्यायाविरोधात डॉक्टरांचा मोर्चा
3 ‘समृद्धी’ रद्द न झाल्यास सामूहिक आत्मदहन
Just Now!
X