विधान परिषदेसाठी आता मतदारांचे प्रबोधन

नाशिक : विधान परिषद निवडणुकीत मतदारांची संख्या जेमतेम ६४४ आहे. कागदी मतपत्रिकेवर पसंतीक्रमानुसार करावयाची मतदान प्रक्रिया काहीशी किचकट असल्याचे लक्षात आल्यावर धास्तावलेल्या उमेदवारांनी हक्काची मते बाद होऊ नये म्हणून प्रचाराबरोबर मतदारांचे प्रबोधन करण्याची तयारी सुरू केली आहे. याकरिता उमेदवारांकडून खास मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहे.

नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी २१ मे रोजी मतदान होत आहे. नेहमीच्या इलेक्ट्रॉनिक यंत्राच्या तुलनेत कागदी मतपत्रिकेवर पसंतीक्रमानुसार करावयाच्या मतदानाची पद्धत वेगळी आहे. मतपत्रिकेत निवडणूक आयोगाकडून दिलेल्या जांभळ्या शाईच्या पेनचा मतदानासाठी वापर करावयाचा आहे. कोणी दुसरा पेन वा शाई वापरल्यास ती मतपत्रिका बाद होईल. मतपत्रिकेवर मागील बाजूला काही चिन्ह किंवा लेखन केल्यास, पसंतीक्रमाची जागा रिक्त ठेवल्यास, अथवा एकाहून अधिक उमेदवारांसमोर एकच पसंतीक्रम लिहिल्यास ती मतपत्रिका बाद ठरविली जाणार आहे. या प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग झाला तर कायदेशीर कारवाईला सामोरे जाऊ लागू शकते, असा इशारा निवडणूक यंत्रणेने दिला आहे. मत कोणकोणत्या कारणांनी बाद होऊ शकते हे लक्षात आल्यावर उमेदवारांची चिंता अधिकच वाढली आहे. मतदान करताना मतदाराकडून कोणतीही त्रुटी राहू नये याकरिता दक्षता घेण्याची तयारी संबंधितांनी सुरू केली आहे.

मागील विधान परिषद निवडणुकीत २३ मतपत्रिका वेगवेगळ्या कारणांनी बाद झाल्या होत्या. यावेळी तसे घडू नये याकरिता उमेदवारांनी प्रचार करताना मतपत्रिका बाद होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी याकडे लक्ष केंद्रित केले आहे.

शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मतदारांसाठी खास मार्गदर्शन घ्यावे लागणार असल्याचे सांगितले. काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी किचकट मतदान प्रक्रियेची माहिती देण्यासाठी खास शिबीर घ्यावे लागणार असल्याचे नमूद केले. प्रात्यक्षिकाद्वारे संबंधितांना रंगीत तालीम करणे गरजेचे आहे. काही मतदार अशिक्षित असतात. क्रमांक टाकून मतदान करावयाची त्यांना कल्पना नसते. यामुळे मतपत्रिका बाद होऊ शकते. तसे घडू नये म्हणून मतदारांचे प्रबोधन करावे लागणार असल्याचे अ‍ॅड. सहाणे यांनी सांगितले. अपक्ष उमेदवार परवेझ कोकणी यांनीदेखील यासंबंधी प्रशासनाला अनेक प्रश्न उपस्थित करत शंकांचे समाधान करून घेतले.

मतदानाची किचकट प्रक्रिया लक्षात घेऊन एकही मत बाद होऊ नये म्हणून प्रशासनाने दिलेल्या सूचना, नियमावली मतदारांपर्यंत पोहोचविली जाणार असल्याचे कोकणी यांनी सांगितले. दरम्यान, मतपत्रिका बाद कधी होईल याची लांबलचक यादी ऐकून उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली.

..तर मतपत्रिका बाद

*   जांभळ्या शाईच्या पेनाव्यतिरिक्त अन्य पेनचा वापर

*   पहिला पसंतीक्रम न देता अन्य पसंतीक्रम लिहिणे

*   मत कोणाला दिले याचा बोध न होणे

*   एकच पसंतीक्रम अनेक उमेदवारांना देणे

*   पसंतीक्रम अक्षरी लिहिल्यास अथवा जागा मोकळी सोडणे

*   पहिला पसंतीक्रम नोटाला देणे

*   इंग्रजी, मराठी, रोमन आकडय़ांची सरमिसळ करणे

*   मतपत्रिकेवर काही विशिष्ट खूण किंवा लेखन करणे