रात्री जेवणासाठी हॉटेलवर गेलेल्या दाम्पत्याची तवेरा मोटार १५०० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रात्री ११ वाजता बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेललगत हा अपघात झाला. अपघातग्रस्तांचे मृतदेह गुजरातच्या अहवा (डांग) मधील जंगलात अडकले असून गुरूवारी दुपापर्यंत गुजरात पोलिसांकडून ते काढण्याचे काम सुरु होते.

मुल्हेर येथील व्यापारी रामजीवन मुरलीधर शर्मा (४८) हे पत्नी पुष्पा शर्मा (४३) सह बुधवारी रात्री साल्हेर किल्ल्यालगतच्या हॉटेल चिकारवर जेवणासाठी गेले होते. अकरा वाजेच्या सुमारास जेवण आटोपून तवेरा मोटारीने ते मुल्हेरकडे येत असतांना हॉटेलपासून काही अंतरावर नियंत्रण सुटल्याने मोटार १५०० फूट दरीत कोसळली. गुजरातमधील डांग जिल्ह्यतील चिंचलीच्या घनदाट जंगलात कारसह दोघे अडकले. या घटनेची माहिती मिळताच मुल्हेर येथील व्यापारी वर्ग तसेच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी जंगलात शोध कार्य सुरू केले असता शर्मा दाम्पत्याचे मृतदेह दिसून आले. घटनेची माहिती जायखेडा पोलिसांना कळविल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. हा अपघात घडला ती जागा गुजरातच्या हद्दीत येत असल्याने गुजरातच्या पोलिसांशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. गुरूवारी सकाळी गुजरात पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने दुपारी उशिरापर्यंत मृतदेह काढण्याचे काम सुरु होते. या प्रकरणी अहवा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, चार वर्षांपासून साल्हेर किल्ल्यालगत असलेल्या गुजरात सीमेवरील डोंगरावर अनधिकृत हॉटेल राजरोस सुरु आहे. गेल्या वर्षी सटाणा येथील युवक देखील दरीत कोसळला होता. मात्र झाडांमध्ये अडकल्याने तो बचावला. याबाबत पोलीस आणि वन विभागाकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे.