महापालिके तर्फे निवड झालेल्या ७० आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुन्हे तर २०० जणांना नोटीस

नाशिक :  करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागाने राबविलेल्या भरती प्रक्रियेत काही जागांवर उमेदवारांची निवड झाली. त्यातील अनेक जण पालिकेच्या सेवेत रुजू झाले नाहीत. अशा ७० कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय २०० उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे.

दोन महिन्यांपासून शहरात करोनाचा कहर सुरू आहे. महापालिका सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या मदतीने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असली तरी त्यात अद्याप यश आलेले नाही. या काळात महापालिकेच्या सेवेतील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ अपुरे असल्याचे निदर्शनास आले. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन महापालिकेने अत्यावश्यक बाब म्हणून मानधन तत्त्वावर तात्पुरत्या कालावधीसाठी भरती प्रक्रिया राबविली. थेट मुलाखत पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली.

काही पदांसाठी उमेदवारांचा प्रतिसाद मिळाला. तर डॉक्टर, भूलतज्ज्ञांशी संबंधित पदांवर अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन कामावर रुजू होण्याची सूचना करण्यात आली. नियुक्तीपत्र मिळालेले ७० कर्मचारी अद्याप रुजू झालेले नाहीत. वारंवार सूचना देऊनही संबंधितांकडून असहकार्याचे धोरण स्वीकारले गेले. त्यांना नोटीस बजावल्या गेल्या. तरीदेखील सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

असाच प्रकार निवडलेल्या आणखी २०० कर्मचाऱ्यांबाबत घडला आहे. हे कर्मचारी अद्याप कामावर हजर झालेले नाहीत. त्यांना मेस्मातंर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. हे कर्मचारी कामावर रुजू न झाल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची तयारी पालिकेने केली आहे.

देयकातील अतिरिक्त रक्कम रुग्णांना परत रुग्णालयांकडून करोना रुग्णांवर उपचार करताना अवास्तव देयक आकारणीचे प्रकार उघड झाल्यानंतर महापालिकेने खासगी रुग्णांलयांमध्ये १३२ लेखा परीक्षक नियुक्त केले. रुग्णाच्या नातेवाइकांना देयक देण्याआधी त्यांच्यामार्फत देयकांची तपासणी केली जात आहे.

लेखा परीक्षकांनी आतापर्यंत ६० रुग्णालयातील १३२६ देयकांची तपासणी केली आहे. त्यातील खासगी रुग्णालय अधिकचे ४३ लाख रुपये उकळण्याच्या प्रयत्नात असल्याचे उघड झाले. देयकांच्या छाननीअंती अतिरिक्त दाखविलेली ही रक्कम रुग्णांना परत देण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे.