न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्वच पोलीस ठाण्यांतील कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरा बसविण्याचे निर्देश गृह विभागाने दिले असले तरी शहरातील केवळ मोजक्याच पोलीस ठाण्यांत आजवर ही यंत्रणा कार्यान्वित केली गेल्याचे समोर आले आहे. नागरिकांना आपल्या मालमत्तेची सुरक्षितता तसेच वस्तूंच्या देखभालीसाठी घर वा व्यवसायाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, असा सल्ला पोलिसांकडून नेहमीच दिला जातो. दुसरीकडे या दलाकडून त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येते. या स्थितीत ज्या पोलीस ठाण्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित झाली, तिच्या देखरेखीसोबत पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी उपयोग होत असल्याचा दावा वरिष्ठांकडून केला जात आहे.
पोलीस ठाण्यात सर्वसामान्यांना मिळणारी वागणूक हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. त्यामुळे नागरिक पोलीस ठाण्याची पायरी चढण्याआधी दहा वेळा विचार करतात. दुसरीकडे एखाद्या गुन्ह्यात पकडलेल्या संशयिताचा कोठडीत मृत्यू होण्याचे प्रकारही घडत असतात. या स्थितीच्या पाश्र्वभूमीवर, मुंबई उच्च न्यायालय तसेच गृह विभागाने मध्यंतरी सर्वच पोलीस ठाण्यांतील कामकाजावर नजर ठेवण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले आहेत.
शासन स्तरावर यासाठी निधीही मंजूर केला गेला. मात्र नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत ज्या ठिकाणी कोठडीची व्यवस्था आहे, त्याच ठिकाणी केवळ ही व्यवस्था उभारण्यात आली आहे. त्यात अंबड, इंदिरानगर, देवळाली कॅम्प, नाशिक रोड, सरकारवाडा, भद्रकाली या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या पोलीस ठाण्यात काही ठिकाणी प्रत्येकी चार, तर काही ठिकाणी सहा सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात अंमलदार कक्षासह अन्य ठिकाणी हे कॅमेरे बसविले असून त्याचा नियंत्रण कक्ष पोलीस निरीक्षकांच्या दालनात आहे. प्रत्येकी तीन महिन्यांच्या चित्रणाचा सीडीमध्ये साठा करत वेळोवेळी त्याची तपासणी केली जाते, असे सांगण्यात आले.
पोलीस ठाण्यात तक्रारदार येतात, तेव्हा कर्मचारी चांगली वागणूक देत नाहीत. अरेरावीची भाषा वापरतात, अशी तक्रार वारंवार केली जाते. या व्यवस्थेमुळे किमान पोलीस सर्वसामान्य नागरिकांना चांगली वागणूक देतील, अशी अपेक्षा आहे. तसेच पोलीस कोठडीत असणाऱ्या संशयितांच्या हालचालींवर नजर ठेवण्याबरोबर त्याला यंत्रणा काही वेगळी वागणूक देत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यास ही यंत्रणा साहाय्यभूत ठरते. आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस ठाण्यांची संख्या १३ असली तरी निम्म्याच पोलीस ठाण्यात सीसी टीव्ही यंत्रणा बसविली गेली आहे. ज्या पोलीस ठाण्यात कोठडीची व्यवस्था आहे, तिथे शहर पोलिसांनी आधी ही यंत्रणा कार्यान्वित केली. उर्वरित पंचवटी, म्हसरूळ, उपनगर, आडगाव, मुंबई नाका, सातपूर, गंगापूर या पोलीस ठाण्यांत ती यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही. या पोलीस ठाण्यात कोठडी नसल्याने आणि सीसी टीव्ही कॅमेरा व्यवस्था एक प्रकारे अडचणीची ठरत असल्याने की काय, त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याचे दिसते.

लवकरच उर्वरित पोलीस ठाण्यांत व्यवस्था
सीसी टीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे पोलीस दलास खूप फायदा झाला आहे. यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात कोण येतो, कोण जातो याची माहिती यंत्रणेकडे राहते. तसेच ठाणे अंमलदार व पोलीस कर्मचाऱ्यांची तक्रारदारांशी वागणूक कशी असते यासह कोठडीतील संशयिताच्या हालचालींवर लक्ष ठेवता येते. या यंत्रणेचे अन्य काही लाभ होत आहे. लवकरच अन्य पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
– एस. जगन्नाथन (पोलीस आयुक्त)