उत्पादनावर काही अंशी परिणाम

‘विना ब्रेक काम’ या मागणीसाठी सातपूर औद्योगिक वसाहतीतील सीएट कारखान्यातील कंत्राटी कामगारांनी मंगळवारी काम बंद आंदोलनास सुरुवात केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे कारखान्यातील उत्पादनावर काही अंशी परिणाम झाला. कंत्राटी कामगारांकडून केल्या जाणाऱ्या मागण्या कायद्याला धरून नसल्याचा आक्षेप कामगार संघटनेने नोंदवला आहे. त्यामुळे काम बंद आंदोलन मागे घेऊन संबंधितांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन करण्यात आले. दुसरीकडे संबंधित कामगारांनी मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास सीटू संघटनेचे मुख्य नेते डॉ. डी. एल. कराड यांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा दिला. दरम्यान, मागील काही दिवसांत औद्योगिक वसाहतीतील वातावरण बदलत आहे. कामगार आणि व्यवस्थापन यांच्या वादात ट्रायकॉम ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी बंद पडली. इतरही काही कारखान्यात यापेक्षा वेगळी स्थिती नसल्याने नाशिकच्या औद्योगिक विकासावर त्याचा परिणाम होत आहे.

शहर व जिल्ह्य़ात मागील काही वर्षांत नवीन उद्योग आले नसल्याची तक्रार नेहमी केली जाते. मात्र नव्या उद्योगाला पोषक वातावरण स्थानिक पातळीवर आहे काय, याचा विचार केला जात नसल्याची उद्योजकांची खंत आहे. याआधी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यातील टोकाच्या मतभेदांचा फटका अस्तित्वातील उद्योगांना बसल्याची उदाहरणे आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच वादातून ट्रायकॉम कारखान्याला टाळे लागले. या कंपनीतील महिला कामगार आजही कारखाना सुरू व्हावा यासाठी धडपड करत आहेत. या घडामोडी सुरू असताना मंगळवारी सीएट कारखान्यातील कंत्राटी कामगारांनी संघर्षांचा पवित्रा स्वीकारला. टायरचे उत्पादन करणारा हा कारखाना आहे. कारखान्यात ७५० कंत्राटी कामगार आहेत. कंपनीच्या नियमाप्रमाणे जे कामगार पाच वर्षे कंत्राटी तत्त्वावर काम करतात, त्यांना कायम सेवेत घेण्यात येते. कायम कामगारांच्या सवलती, पगारवाढ त्यांना दिली जाते. मात्र हे करताना काही कामगारांना साडेचार वर्षे पूर्ण झाल्यावर सहा महिन्यांचा ब्रेक दिला जातो. याबाबतचा करार २०१२ मध्ये संघटनांशी करण्यात आला. कोणताही ब्रेक न देता काम करू द्यावे या मागणीसाठी ‘काऊंटिग’ विभागातील कामगार मंगळवारी सकाळी प्रवेशद्वारावर जमले आणि त्यांनी आंदोलन सुरू केले.

वास्तविक यातील ज्या कामगारांनी ५ वर्षे काम पूर्ण केले, त्यांना संघटनेने व्यवस्थापनाशी चर्चा करत कायम करून घेतले आहे. त्यांना कंपनीचा अधिकृत गणवेशही मिळाला असून त्यांची पगारवाढ झाली. ज्या कामगारांबाबत ही प्रक्रिया झाली नाही, त्यांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारल्याचे सांगितले जाते. या दिवशी नियमित कामगार आपापल्या विभागांत काम करत होते, तर १०० ते १५० कंत्राटी कामगार प्रवेशद्वारावर निदर्शने करत होते. या संदर्भात संघटनेचे जिल्हा सचिव गोकुळ घुगे यांनी कंत्राटी कामगार असल्याने त्यांचा कोणत्याही संघटनेशी संबंध नसल्याचे नमूद केले. कंत्राटी कामगारांच्या मागण्या बेकायदेशीर असून त्या कोणत्याही स्थितीत मान्य होणार नाही, असे ते म्हणाले. आंदोलनांनी आम्ही ज्या वेळी कामावर रुजू झालो, त्या वेळी ब्रेकची अट नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विनाब्रेक काम करू द्यावे ही आमची कायम आहे. ब्रेकमुळे कामगारांना अप्रत्यक्षरीत्या कामावरून काढले जाण्याचा धोका आहे. आमची मागणी मान्य न झाल्यास कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार

दोन ते तीन वर्षांपूर्वी सीएट कारखान्यात याच स्वरूपाचा वाद उद्भवला होता. त्या वेळी कामगार उपायुक्त कार्यालयाने मध्यस्थी करत करार घडवून आणला. कंत्राटी कामगारांकडून झालेल्या आंदोलनाबाबत अद्याप कोणी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधलेला नाही. व्यवस्थापन वा संबंधित कामगारांनी दाद मागितल्यास संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.

आर. एस. जाधव (कामगार उपायुक्त)