नाशिक : माऊली..माऊली आणि जय हरी विठ्ठलच्या अखंड जयघोषात आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांसमोर नतमस्तक होऊन भाविकांनी सावळ्या विठूरायाचे दर्शन घेतले. करोना र्निबधांमुळे शहरातील बहुतांश मंदिरे बंद असली तरी अपवाद वगळता काही मंदिरे अल्प कालावधीसाठी उघडण्यात आली होती.

आषाढीनिमित्त मंदिरांमध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. हरिपाठासह अभंग, कीर्तन मंदिराबाहेर सुरू होते. करोनामुळे मंदिरे बंद असल्याने मंदिरांसमोर उभे राहून भाविकांकडून जयघोष करण्यात येत होता. कॉलेज रोडवरील

विठ्ठल मंदिर सकाळी अल्प काळासाठी उघडण्यात आले होते. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी रिघ लावली होती. शहरातील शाळा बंद असल्या तरी काही शाळांमध्ये शिक्षकांनी आषाढीनिमित्त पालखी काढून भक्तिभावाचा आनंद घेतला. काही शाळांकडून ऑनलाईन पध्दतीने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. बालकांनी विठ्ठलासह संतांची वेशभूषा परिधान के ली होती.