शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न

चारुशीला कुलकर्णी, नाशिक

जिल्ह्य़ात दुष्काळसदृश परिस्थिती असताना कांदा, टोमॅटो यांना हमीभाव मिळत नाही. थंडीचा तडाखा वाढल्याने द्राक्ष पीकही धोक्यात येत असल्याची स्थिती आहे. आदिवासी शेतकऱ्यांना हे दृष्टचक्र भेदता यावे यासाठी येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला आहे. दत्तक ग्राम उपक्रमाअंतर्गत आदिवासीबहुल असलेल्या चार गावांमध्ये केंद्राच्या वतीने प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली असून ४०० शेतकरी या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. या प्रकल्पांमुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

विद्यापीठाच्या वतीने कृषी विस्तार शिक्षण प्रसारासाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सहकार्याने जिल्ह्य़ात ठिकठिकाणी काम सुरू आहे. जिल्ह्य़ातील माती प्रकार, वातावरणातील बदल यासाठी आवश्यक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. दत्तक ग्राम अंतर्गत जिल्ह्य़ातील आदिवासीबहुल असलेल्या बहादूरवाडी, घनशेत, साकोरे आणि जातेगाव या ठिकाणी केंद्राने काम करण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत सद्यस्थितीत शेतावर चाचणी घेऊन तंत्रज्ञानाचा वापर करत सुधारणा कशी करता येईल, महिला सबलीकरणात महिलांचे श्रम कसे वाचतील, त्यांचे आरोग्य तसेच ग्रामीण युवकांना कृषी प्रक्रिया उद्योगाशी संबंधित प्रशिक्षण देणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आदिवासी शेतकरी प्रामुख्याने भात, नाचणी या पिकांची लागवड करतात. या पिकाला पर्याय देत कमी खर्च आणि श्रमात शेती कशी करता येईल, यासाठी काही ठिकाणी पर्यायी पीक म्हणून कांदा, लसूण, आंबा यासह सुरणाची शेती करण्यास सुरुवात झाली आहे. शेतीत माती परीक्षण करत लागवड पद्धतीत काही बदल करण्यात येत आहे. यासाठी प्रात्यक्षिकांवर भर देण्यात येत आहे. तसेच बी-बियांणाचा वापर करत उत्पादन कसे वाढवावे याची माहिती दिली जात आहे. दुसरीकडे शेतीपूरक व्यवसाय म्हणून कोंबडी, शेळी, गाय यांचे पालन करण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे.

‘न्यूट्रिशन गार्डन’ संकल्पना राबविणार

शेतकरी विशेषत आदिवासी हा दुर्लक्षित घटक आहे. त्यांच्या कृषी विकासासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून कृषी विकासासह त्यांचे सक्षमीकरण, आरोग्य या विषयावर काम सुरू आहे. शेतीत ‘न्यूट्रिशन गार्डन’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. जेणेकरून घरातील लहान मुले, महिलांना वेगवेगळी पिके-भाजीपाला घेतल्याने घरच्याघरी पोषक आहार उपलब्ध होईल. तसेच या प्रयोगामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडेल, त्यांचे जीवनमान सुधारेल. हा प्रयोग व्यापक स्वरूपात पुढे नेण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.

-रावसाहेब पाटील  (प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र)