वेळापत्रक अजूनही विस्कळीतच

दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्यापासून बंद असलेली नाशिकरोड-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक तब्बल ३८ तासानंतर एकेरी पद्धतीने परंतु संथगतीने सुरू झाली. सलग तिसऱ्या दिवशी रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक रुळावर आले नाही. चाकरमान्यांसाठी महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस मुंबईत अडीच तास विलंबाने पोहोचली.

मंगळवारी सकाळी नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या दुरान्तो एक्स्प्रेसचे डबे आसनगाव जवळ घसरल्याने दोन्ही रेल्वे मार्गाचे मोठे नुकसान झाले होते. या मार्गावरील तब्बल ३८ तास ठप्प असलेली वाहतूक बुधवारी रात्री एकेरी पद्धतीने सुरू करण्यात आली. उपरोक्त परिसरात पाऊस सुरू असल्याने दुरुस्तीच्या कामात अडथळे येत आहे. यामुळे नाशिकरोड-मुंबई दरम्यानचा दुसरा मार्ग खुला करण्यास विलंब होत आहे. एकेरी मार्ग सुरू झाल्यामुळे रेल्वे वाहतूक काही अंशी पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. रेल्वे प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. नाशिक व मनमाडहून मुंबई व नाशिकला ये-जा करणारे चाकरमानी व विद्यार्थी पंचवटी, राज्यराणी व गोदावरी एक्स्प्रेसवर अवलंबून असतात. या दिवशी पंचवटीला रेल्वेने हिरवा कंदील दाखविला असला तरी उर्वरित दोन्ही गाडय़ा रद्द करण्यात आल्या. परिणामी, सलग तिसऱ्या दिवशी प्रवाशांना सक्तीची विश्रांती घेणे भाग पडले. पंचवटी एक्स्प्रेसने गेलेल्या प्रवाशांना वेळेत मुंबईतील कार्यालय गाठता आले नाही. ही गाडी पुढे रस्त्यात दोन तास थांबवून ठेवण्यात आली. एकेरी मार्गामुळे एका बाजूकडील गाडय़ा थांबवून दुसऱ्या बाजूकडील रेल्वे मार्गस्थ केली जात होती. त्या मार्गस्थ झाल्यावर समोरील वाहतूक थांबवून नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ा सोडल्या जात होत्या.

या घटनाक्रमामुळे लांब पल्ल्याच्या लखनौ-एलटीटी, पुरी-एलटीटी, कामायनी, हरिद्वार, पठाणकोट आदी गाडय़ा जवळपास १२ तास विलंबाने धावत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

काही रेल्वेगाडय़ांचा प्रवास मध्येच खंडित करण्यात आला. गोरखपूर-सीएटी व जनशताब्दी एक्स्प्रेस नाशिकहून माघारी पाठविल्या गेल्या. आदल्या दिवशीच्या रेल्वेगाडय़ा वेळेत न पोहोचल्याने गुरुवारी एकूण १२ गाडय़ा रद्द करण्यात आल्या.

आसनगावलगतचा दुसरा मार्ग खुला होईपर्यंत कोलमडलेले हे वेळापत्रक सुरळीत होणार नाही. गुरुवारी रात्रीपर्यंत हा मार्ग खुला होईल, अशी अपेक्षा आहे. रेल्वे मार्ग ठप्प असल्याने आदल्या दिवशी शुकशुकाट असणाऱ्या नाशिकरोड रेल्वे स्थानकावर गुरुवारी प्रवाशांची काही अंशी गर्दी झाली. परंतु, विलंबाने होणारी वाहतूक लक्षात घेऊन अनेकांनी मुंबईला जाणे टाळले.

मुंबईसाठी जादा ३२ बसेस

नाशिक-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक सुरळीत झाली नसल्यामुळे प्रवाशांची भिस्त रस्ते मार्गावर आहे. पावसामुळे मुंबईकडे जाणे टाळणाऱ्या प्रवाशांनी गुरुवारी बसस्थानकावर गर्दी करण्यास सुरुवात केली. मुंबईला दररोज जाणाऱ्या ६१ बसेस वगळता जादा ३२ गाडय़ा सोडण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. पावसाच्या धसक्याने प्रवासी मुंबईला जाणे टाळत होते. मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गुरुवारी सकाळपासून प्रवाशांनी महामार्ग बसस्थानकावर गर्दी करण्यास सुरुवात केली. खासगी प्रवासी वाहतूकदार अवाच्यासवा भाडे आकारणी करीत असल्याने प्रवाशांनी एसटी महामंडळाला पसंती दिली. दररोज नाशिकहून मुंबईला ६१ बसेस वेगवेगळ्या स्थानकात पाठविल्या जातात. गुरुवारी गर्दी लक्षात घेऊन जादा ३२ बसेस कल्याण, ठाणे व बोरिवलीसाठी सोडण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.