रस्ते अपघातांविषयी केवळ चिंता व्यक्त न करता त्यावरील उपायांविषयी शंभर दिवस द्वारका येथील काठेगल्ली सिग्नलवर ‘हेल्मेट सक्ती’विषयी प्रबोधन करणाऱ्या केरळ महिला विकास समितीचा त्यांच्या या अभियानाने शंभर दिवस पूर्ण केल्यानिमित्त विश्वास बँकेच्या वतीने गौरव करण्यात आला.

याप्रसंगी केरळ महिला विकास समितीच्या जया कुरूप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ज्योती ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्योती ठाकूर यांनी तरुण पिढीने आपल्या जीवनाचे मोल तसेच कौटुंबिक जबाबदारीची जाणीव ठेवायला हवी, असा सल्ला दिला. सक्तीशिवायही हेल्मेट वापरण्याची सवय ज्या दिवशी जोपासली जाईल, त्या दिवशी भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून यासाठी विविध सामाजिक संस्था पुढाकार घेत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. विश्वास बँकेचा यातील सहभाग सर्वानाच प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. संदीप भानोसे यांनी रस्ते अपघात आणि नियमांचे उल्लंघन याविषयी जनजागृती होण्यासाठी असे उपक्रम निश्चितच दिशादर्शक असल्याचे सांगितले. यावेळी काठेगल्ली सिग्नलवर हेल्मेटधारक आणि सीट बेल्टचा वापर करणाऱ्यांना गुलाबपुष्प देण्यात आले.

नाशिकमधील रस्ते वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. वाहनचालकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन, बेशिस्तपणा हे यामागील महत्त्वाचे कारण आहे. रस्ते वाहतुकीमध्ये होणारे अपघात हा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. हे अपघात कमी होण्यासाठी वाहनचालकाने काळजी घेण्याबरोबरच वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे निश्चितच अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. वाहतूक सुरक्षा आणि हेल्मेट सक्तीविषयी जनप्रबोधन व्हावे, या उद्देशाने विश्वास बँक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय केंद्र, विश्वास ज्ञानप्रबोधिनी सारस्वत बँक आदींच्या वतीने काठेगल्ली येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची संकल्पना बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांची होती. ‘नाशिक फर्स्ट’ या संस्थेच्या सहकार्याने ते वाहतूक सुरक्षेविषयी अनेक उपक्रम राबवीत असतात.